
देव आपल्याला जीवन देतो आणि डॉक्टर आपल्याला ते जीवन निरोगीपणे जगण्यास मदत करतात. त्यामुळे डॉक्टरलाही आपण देवाचा दर्जा देतो. पण सध्याच्या युगात अनेकदा डॉक्टरकी पेशाला काळिमा फासणाऱ्या घटना घडतात. असाच प्रकार मध्य प्रदेशमधील दामोह येथून समोर आला आहे. येथे एका बनावट डॉक्टरने हृदय शस्त्रक्रिया केलेल्या 7 रुग्णांना महिन्याभरात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नरेंद्र विक्रमादित्य यादव असे बनावट डॉक्टरचे नाव आहे. हा माणूस स्वत:ची ओळख डॉ. एन. जॉन केम अशी करून देतो. त्याच्याकडे रुग्णांवर उपचार करण्याचे योग्य वैद्यकीय प्रमाणपत्रही नाही. मात्र त्याने एका खासगी ख्रिश्चन मिशनरीमध्ये हृदयरोग तज्ज्ञ म्हणून नोकरी मिळवली. तिथे त्याने हृदयरोगावर शस्त्रक्रिया केलेल्या 7 रुग्णांचा महिन्याभरात मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्याचा भंडाफोड झाला.
नेमकं प्रकरण काय?
नरेंद्र विक्रमादित्य यादव नावाच्या व्यक्तीने आपण ब्रिटनमधील प्रसिद्ध आहोत आणि आपले नाव डॉ. एन. जॉन केन असल्याचे सांगत एका खासगी ख्रिश्चन मिशनरीमध्ये नोकरी मिळवली होती. तिथे तो हृदयरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णांवर उपचार करत होता. नोकरी मिळाल्यानंतर त्याने ज्या ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया केली त्यातील बहुतांश रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाबाबत आणि अनुभवाबाबत चौकशी करण्यात आल्यानंतर हा खुलासा झाला. याबाबत दामोह जिल्ह्याच्या बाल कल्याण शिक्षण समितीचे अध्यक्ष दीपक तिवारी यांनी तक्रार दाखल केली असून आता हे प्रकरण राष्ट्रीय मावाधिकार आयोगाकडे गेले आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक रुग्णांवर या ठगाने उपचार केले. त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या 15 रुग्णांपैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे, असे दीपक तिवारी यांनी सांगितले. याबाबत त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्रही लिहिले असून रुग्णालयाने हे मृत्यू लपवल्याचा आरोप केला आहे. रुग्णालयाने मृतांच्या कुटुंबीयांची दिशाभूल करत त्यांच्याकडून जास्त शुल्क आकारले आणि शवविच्छेदन न करताच मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले असा आरोपही तिवारी यांनी केला.
आरोपीने यूके रिटर्न डॉक्टर असल्याचा खोटा दावा केला. त्याने लंडनमधील सेंट जॉर्ज विद्यापीठातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ प्रो. जॉन केम यांच्या नावाचाही गैरवापर केला, असा आरोपही तिवारी यांनी केला असून रुग्णालयात झालेल्या मृत्युंची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच आरोपी नरेंद्र यादव आणि मिशनरी रुग्णालया व्यवस्थापनाविरुद्ध खुनाचा खटला चालवून रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याची मागणी केली आहे.