मध्य प्रदेशात भीषण अपघात, ट्रॅक्टर ट्रॉली पलटून 4 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर

वाहतूक विभागाकडून वारंवार रस्ता सुरक्षा आणि जागरुकता अभियान चालवले जात असूनही मध्य प्रदेशात रस्ते अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीय. आज ग्वाल्हेर येथून भीषण अपघाताची बातमी समोर आली असून ट्रॅक्टर -ट्रॉली पलटून 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 लोकं गंभीर जखमी झाले आहेत.

घाटीगाव येथील ही घटना आहे. बोलले जात आहे की, हे सर्व औषधी वनस्पती घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे. टॅक्टर ट्रॉलीमध्ये 30 लोकं होती. दरम्यान घाटीगांव जखोदी जवळ ट्रॅक्टर अचानक अनियंत्रित होऊन पलटला. त्याने 4 लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 10 लोकं गंभीर जखमी झाली आहेत. अन्य सर्वांना दुखापत झाली आहे. घटनास्थळी एकच किंचाळ्या पसरल्या होत्या.

फूलवती आदिवासी (35), कस्तूरी बाई (65), रामदास आदिवासी (46), अरुण आदिवासी (14) अशी मृतांची नावे आहेत. सध्या घाटीगाव पोलीस ठाणे या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले. जवळपासच्या लोकांच्या मदतीने सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.