
लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत राहिली असून महाराष्ट्रातील लाडक्या बहीण योजनेतून मिळणारी रक्कम वाढवण्यात न आल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. असे असतानाच मध्यप्रदेशातील भाजप सरकारने देखील ‘लाडली बहना’ योजनेच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रानंतर, मध्यप्रदेश सरकारने बुधवारी आर्थिक वर्ष 25-26 साठी लाडली बहना योजनेची तरतूद कमी करून 18,669 कोटी रुपये करण्याची घोषणा केली. याआधी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 18,984 कोटी रुपये होती. इटीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
ही योजना मध्य प्रदेशच्या राज्य सरकारने मे 2023 मध्ये सुरू केली होती आणि याअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील विवाहित महिलांना सुरुवातीला 1,000 रुपयांची मदत दिली जात होती जी नंतर दरमहा 1,250 रुपये करण्यात आली.
अलीकडेच, महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठीचा खर्च मागील वर्षाच्या तुलनेत 10,000 कोटी रुपयांनी कमी केला आहे. 2025-26 साठी अंदाजे वाटप 36,000 कोटी रुपये होते.
या अधिवेशनात महाराष्ट्रावर इतिहासातील सर्वाधिक कर्जाचा अंदाज 9.3 लाख कोटी रुपयांचा आहे आणि 25-26 साठी अंदाजे 45,891 कोटी रुपयांचा महसूल तूट ही मोठी तूट असल्याचे दिसून आले आहे.
यंदा अर्थसंकल्पात कोणतीही नवीन मोठी योजना जाहीर करण्यात आली नाही. निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासने जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेतनात 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये प्रति महिना वाढ आणि शेतकरी कर्जमाफी, यांना हिरवा कंदील देण्यात आलेला नाही.