जागतिक शहर असलेल्या मुंबईची अवस्था बिकट, अपुरा पाणीपुरवठा, रस्ते-पुलांची रखडपट्टी, रुग्णालयांची दुरवस्था; शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर असूनही अपुरा आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, केईएम, नायर यांसारख्या नावाजलेल्या रुग्णालयांची दुरवस्था, रस्ते-पुलांची रखडलेली कामे, अस्वच्छता यामुळे मुंबईकर हैराण झाले असून लवकरात लवकर हे सर्व प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित कामांच्या संदर्भात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त भूषण गगराणी यांची आज भेट घेतली. यावेळी आमदार अजय चौधरी, मनोज जामसूतकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, माजी नगरसेवक सचिन पडवळ आदी उपस्थित होते. दरम्यान, इमारत प्रस्ताव विभागातील गैरकारभार, पालिकेच्या मालकीच्या निवासी वस्त्यांची दुरवस्था तसेच गिरगावमधील स. का. पाटील उद्यानाजवळील सभागृहाचे रूपांतर बंदिस्त सभागृहात करा, अशी मागणी अरविंद सावंत यांनी पालिका आयुक्तांकडे केली.

केईएम, नायरच्या  रुग्णालय काही जुन्या, मोडकळीला आलेल्या इमारती पाडून तिथे 40 मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव खूप वर्षे पडून आहे. सीटी स्पॅन, एमआरआय मशीनचा पुरवठा असून तत्काळ याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी केली.

अभ्युदय नगर, कुलाब्यातील आंबेडकर नगर येथील रहिवाशांना कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. चर्नी रोड स्थानकाजवळ स्वच्छतागृहाची आवश्यकता असून कचऱ्याची वरचेवर विल्हेवाट लावावी. शिवडीतील दारूखाना परिसराची अवस्था बिकट आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पुलांची लटकंती

शिवडी, कॉटन ग्रीन, रे रोड, चर्नी रोड, गिरगाव चौपाटी, नाना चौक त्याचबरोबर प्रभादेवी आणि परळ स्टेशनला एण्ड टू एण्ड जोडणारा पूल अशा अनेक प्रलंबित आणि रखडलेल्या पुलांमुळे रहिवाशांची गैरसोय होत असून प्रशासनाकडे पाठपुरावा करून हे प्रकल्प मार्गी लागले आहेत, मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पांना गती आलेली नाही, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.