कल्याण शहरात चालता-फिरता सिग्नल; ट्रॅफिककोंडीवर वाहतूक विभागाचा नवा फंडा

कल्याण, डोंबिवलीतील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी केडीएमसीने एक नवा फंडा अमलात आणला आहे. सततची ट्रॅफिककोंडी असलेल्या ठिकाणांचा पालिकेने सर्व्हे केला आहे. या सव्र्व्हेनुसार कल्याणमधील पाच प्रमुख चौक आणि रस्त्यांच्या ठिकाणी आता चालता-फिरता सिग्नल सुरू केला आहे. सोलरवर आधारित पोर्टेबल स्टॅण्ड असलेली ही सिग्नल यंत्रणा सहजानंद चौक परिसरात कार्यान्वित केली आहे.दिवसभरातील वाहतूककोंडीचा विचार करून ठरावीक वेळेनुसार ही पोर्टेबल सिग्नल यंत्रणा सहजानंद चौक, आग्रा रोड, दुर्गाडी चौक, लाल चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैलबाजार या ठिकाणी वापरात आणली जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. फिरत्या सिग्नलचा नागपूरमध्ये प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता कल्याण आणि डोंबिवलीत हा प्रयोग अमलात आणला जात आहे. यासाठी खास ट्रॅफिक पोलीस, वॉर्डन आणि पालिका कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे.