Movie Review – हुकलेली रटाळ मॅच – मि. अँड मिसेस माही

>> रश्मी पाटकर

क्रिकेट हा आपल्या देशातील तमाम जनतेसाठी प्रचंड आवडीचा आणि नाजुक विषय आहे. कारण, या खेळाने तमाम हिंदुस्थानींचं जग बदलून टाकलं. एखाद्या खेळाडूचा कस पाहणारा खेळ म्हणूनही क्रिकेट हा लोकप्रिय आहे. अर्थात त्यामुळेच क्रिकेटकेंद्रीत असे अनेक चित्रपट आजवर येऊन गेले. त्याच यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. पण, क्रिकेटसारखा विषय असूनही विषयाच्या रटाळपणामुळे या चित्रपटाची मॅच हुकलेली आहे. त्याचं नाव म्हणजे मि. अँड मिसेस माही.

माही हे नाव लोकप्रिय झालं ते महेंद्र सिंग धोनीमुळे. टीम इंडियाचा कॅप्टन कूल आणि सर्वात यशस्वी कर्णधार. त्याचं नाव असलेल्या दोन क्रिकेटवेड्या जिवांची ही कथा आहे. महिमा (जान्हवी कपूर) आणि महेंद्र (राजकुमार राव) हे एक विवाहित जोडपं. महेंद्रला क्रिकेटपटू व्हायचं असतं पण त्याची निवड न झाल्यामुळे वडील (कुमुद मिश्रा) संधी देत नाहीत आणि आपल्या खेळांचं साहित्य विकणाऱ्या दुकानाच्या गल्ल्यावर त्याला बसवतात. आयुष्यात क्रिकेटच्या वेडापायी इतर कोणत्याही गोष्टी धड न करू शकल्याने कुटुंबाच्या लेखी महेंद्र कुचकामी असतो. मात्र, महेंद्रचं लग्न डॉक्टर असलेल्या महिमासोबत होतं. क्रिकेटप्रेमामुळे ते दोघंही एकमेकांकडे आकर्षित होत जातात. दरम्यान, एका प्रसंगात महेंद्र याला महिमा ही उत्तम क्रिकेट खेळू शकते याचा साक्षात्कार होतो. त्यामुळे तो तिला प्रशिक्षण देऊन व्यावसायिक क्रिकेटकडे वळण्यासाठी मेहनत घेतो. ही मेहनत यशस्वी होते का? आपण काहीतरी करू शकतो, हे पटवून देण्यात महेंद्र यश मिळवतो का? हे मात्र चित्रपटातच पाहावं लागेल.

चित्रपटाची कथा ही क्रिकेट केंद्रित असली तरी त्यात मानवी भावनांचे पैलू जोडण्यात आले आहेत. त्यामुळे पटकथा कधी कधी भरकटत जाते. पटकथेत असंख्य उणीवा राहून गेल्या आहेत. तीच बाब अभिनयाची आहे. जरीना वहाब, कुमुद मिश्रा, राजकुमार राव यांनी चांगला अभिनय केलेला असला तरी जान्हवी कपूर मात्र अद्यापही ठोकळा वर्गातच मोडते. विशेषतः तिने क्रिकेटपटू म्हणून कायिक, आंगिक अभिनयाकडे लक्षच दिलेलं नाही. त्यामुळे तिची व्यक्तिरेखा उथळ झाली आहे. मात्र विशेष कौतुक ते क्रिकेट प्रशिक्षक झालेल्या संदेश कुलकर्णी यांचं. त्यांनी आपली भूमिका चपखलपणे साकारली आहे. चित्रपटाची तांत्रिक बाजूही ठीकठाक आहे. गाणी फारशी श्रवणीय नाहीत. त्यामुळे लक्षात राहत नाहीत. दिग्दर्शनाबाबत बोलायचं झालं तर अनेक भावनांची गल्लत करण्यात कथेचा आत्माच हरवल्याचं सातत्याने दिसून येतं.

थोडक्यात, विविध भावनिक विषयावर आधारलेल्या चित्रपट कथांची सरमिसळ करून ती क्रिकेटच्या मॅचमध्ये घुसवल्यामुळे हा चित्रपट ना क्रिकेटविषयी धड सांगतो ना भावनांविषयी. त्यामुळे मि. अँड मिसेस माही या चित्रपटाची ही मॅच अत्यंत रटाळ आणि हुकलेली आहे.