माऊंट एव्हरेस्ट 150 मीटरने वितळला, नासाच्या सॅटेलाईट इमेजवरून उघड

जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टचा वरील भागातील बर्फाचे आवरण तब्बल 150 मीटरपर्यंत वितळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दर हिवाळ्यात येथील बर्फ वितळत आहे. विशेषकरून 2024-25 दरम्यान बर्फ घट झाल्याचे नासाच्या उपग्रहाद्वारे काढण्यात आलेल्या छायाचित्रांवरून उघड झाले आहे. याबाबत संशोधकांचे संशोधनही सुरू आहे.  ऑक्टोबर 2023 पासून ते जानेवारी 2025 च्या सुरुवातीपर्यंत अमेरिकेच्या नासाने काढलेल्या छायाचित्रांचे विश्लेषण केल्यानंतर 2024 आणि 2025 च्या जानेवारीमध्ये काही प्रमाणात बर्फ वाढल्याचेही दिसत आहे. अमेरिकेच्या निकोल्स कॉलेजच्या पर्यावरण सायन्स विभागाचे प्राध्यापक आणि ग्लेशियरचा अभ्यास करणारे ग्लेशियोलॉजिस्ट मौरी पेल्टो यांनी 2 फेब्रुवारी रोजी एक ब्लॉग पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी माऊंट एव्हरेस्ट वितळत असल्याबाबतचे संपूर्ण विश्लेषण केले आहे.

माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून तब्बल 8 हजार 849 मीटर उंचावर आहे. हिमालयाचे टोक नेपाळ व तिबेट या दोन्हीच्या मध्ये हे शिखर आहे.

हिवाळ्यातच बर्फ घटतोय

हिवाळ्यात बर्फाचे प्रमाण घटत चालल्याचे दिसत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळत असल्याचे समोर आले आहे. 2021, 2023, 2024 आणि 2025च्या हिवाळ्यात माऊंट एव्हरेस्टचा बर्फ कमी झाला. जंगलात आगीच्या घटनाही वाढत असल्याने बर्फ वितळत असल्याचे समोर आल्याचे पर्यावरणतज्ञ मौरी पेल्टो यांनी म्हटले आहे.