
चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागातील सहायक मोटर निरीक्षक व एक खासगी कर्मचाऱ्याला 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई तेलंगणा सीमेवर असलेल्या लक्कडकोट RTO चेकपोस्टवर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा तेलंगणातील आदिलाबाद येथील असून त्याचे ट्रक आदिलाबाद ते चंद्रपूर या मार्गावर नियमित चालतात. घटनेच्या वेळी कर्तव्यावर सहायक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते आणि त्याचा खासगी कर्मचारी जगदीश डफडे उपस्थित होता. यावेळी तेलंगणा सीमेवर ट्रकला थांबवून कागदपत्रांची त्यांनी तपासणी केली. सर्व कागदपत्रे बरोबर असताना व गाडीचे वजन बरोबर असतानाही एन्ट्रीच्या नावाखाली 500 रुपये लाचेची मागणी त्यांनी केली. ही रक्कम देण्याचे ट्रक चालकाने मान्य करून 500 रुपये दिले. हे पैसे स्वीकारताच तिथे तैनात असलेल्या ACB पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
एजंट जगदीश डफडे व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता कार्यालयात 56 हजार रुपये सापडले आहेत. या रक्कमेबाबत त्यांनी कुठलेही सबळ स्पष्टीकरण न दिल्याने हे पैसेही जप्त करण्यात आले आहेत. ही संपूर्ण कारवाई ACB च्या अमरावती येथील पथकाने केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लक्कडकोट येथे RTO चे आंतरराज्यीय चेकपोस्ट आहे. मालवाहू वाहनांची मोठी वाहतूक या मार्गावरून होते. या वाहनधारकांना लुटण्याचे प्रकार इथे नियमित होत असल्याच्या तक्रारी आहेत. आज प्रत्यक्ष अधिकारीच सापडल्याने ट्रक चालकांना कसे लुटले जाते, हे स्पष्ट झाले.