कुठलीही परिस्थिती असो आई लेकरांना संकटातून बाहेर काढतेच, याची प्रचिती देणारी थरारक घटना दिंडोरीच्या लखमापूरमध्ये मंगळवारी घडली. आठ वर्षीय मुलीला बिबट्याने झडप घालून बिबट्यात पकडले. जवळच द्राक्षबागेत काम करणारी आई क्षणाचाही विलंब न करता विळा घेऊन बिबट्यामागे धावली. तिचे रौद्ररूप पाहून या जंगली श्वापदाने मुलीला तिथेच सोडून धूम ठोकली आणि मुलगी वाचली. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आठ वर्षीय गुंजन बापुसाहेब शिंदे ही मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी आली. मात्र, आई नसल्याने तिला शोधत शेतात गेली. मायलेकी एकमेकापासून अवघ्या काही फुटांवर होत्या. तेव्हाच झुडुपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून गुंजनला जबडय़ात पकडले. हे बघताच आई विळा घेऊन जिवाच्या आकांताने आरडाओरड करीत बिबट्याच्या दिशेने धावली. यामुळे बिबट्या गुंजनला सोडून पळाला. आईच्या धाडसाने लेकीचे प्राण वाचले. मात्र, मानेला गंभीर जखम झाली. खासगी रुग्णालय, दिंडोरी आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
- दिंडोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांनी जखमी मुलीची भेट घेतली. तिच्या जखमा गंभीर असून उपचारानंतर प्रकृती स्थिर आहे, असे त्यांनी सांगितले. लखमापूर भागात आधीच दोन पिंजरे लावलेले आहेत, मुलीवरील हल्ल्यानंतर या शेताजवळही पिंजरा लावला असल्याचे ते म्हणाले.