आईपासून दुरावलेल्या मुलाची भेट झालीच पाहिजे, मुलाचा शोध घेण्याचे आदेश

mumbai-high-court1

वडिलांच्या ताब्यात असलेला तीन वर्षांचा मुलगा सापडत नसल्याने एका आईने हायकोर्टात धाव घेत याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत आईपासून दुरावलेल्या मुलाची भेट झालीच पाहिजे, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने पोलिसांना हरवलेल्या मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले.

तीन वर्षांच्या मुलाची आई आणि वडील वेगवेगळे राहत असून मुलगा वडिलांसोबत राहतो. मात्र मुलाचा थांगपत्ता लागत नसल्याने मुलाच्या आईने याप्रकरणी उच्च न्यायालयात ऍड. मच्छिंद्र पाटील यांच्यामार्फत हेबीअस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्या आईच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, मुलाचे वडील मुलाला जबरदस्तीने घेऊन गेले. त्यामुळे आई मुलापासून दुरावली असून मुलाच्या सुरक्षेची आईला चिंता आहे. मुलाचे काका व इतर नातेवाईकांच्या वतीने ऍड. इंद्रजित कुलकर्णी यांनी खंडपीठाला सांगितले की, मुलाचे वडील कुटंबीयांच्या संपर्कात नाहीत. त्यांना मुलाबद्दल व त्याच्या वडिलांबद्दल माहिती नाही. खंडपीठाने याची दखल घेत मुलाचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले व सुनावणी 20फेब्रुवारी रोजी ठेवली.