नऊ महिन्यांच्या बाळाला विष पाजून आईने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव गावामध्ये घडली आहे. पल्लवी मितेश पारोधे (वय – 27) असे आईचे, तर स्मित मितेश पारोधे (वय – 9 महिने) असे मुलाचे नाव आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी पंचनामा करून मयत पल्लवीचा मृतदेव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठविला आहे. दुसरीकडे सासरची लोकं पैशांसाठी वारंवार त्रास देत असल्याची तक्रार मयत पल्लवीच्या वडिलांनी पोलिसांत केली आहे. त्यानुसार शेगाव पोलिसांनी हुंडाबळी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत मयत पल्लीवाचा पती व दिराला अटक केली आहे. पुढीत तपास ठाणेदार योगेंद्रसिंह यादव करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील पारोधे कृषी आरोग्य केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या तरुणीसोबत लग्न झाले होते. या जोडप्याला 9 महिन्यांचा मुलगा आहे. मात्र शनिवारी सायंकाळी पल्लवी राहत्या घरात गळफास घेतल्याच्या, तर मुलगा स्मित हा बेशुद्धावस्थेत आढळला. याची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्थानकाचे ठाणेदार योगेंद्रसिंरह यादव यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला आणि पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
मुलीची आत्महत्या नाही तर हत्या
दरम्यान, सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार वाटत होता. मात्र मुलीच्या माहेरच्यांनी लग्नानंतर तिचा हुंड्यासाठी सासरच्यांकडून शारिरीक आणि मानसिक छळ सुरू होता असा आरोप केला. मुलगा झाल्यानंतर सर्व सुरळीत होईल अशी आशा होती, मात्र त्यानंतरही तिचा छळ केला जात होता. त्यामुळे मुलीने आत्महत्या केलेली नसून नातवाला विष पाजत सासू आणि पतीने पल्लवीची हत्या केल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला. या तक्रारीवरून पोलिसांनी पल्लवीच्या पतीला आणि दिराला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.