
प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने मातेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी शास्त्रीनगर रुग्णालयात घडली. सुवर्णा सरोदे (26) असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेत नवजात बाळ बचावले आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बळी गेल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा देत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या दिला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथे राहणारी सुवर्णा सरोदे ही महिला 11 फेब्रुवारी रोजी प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झाली. दिवसभर तिच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. दुसऱ्या दिवशी 12 फेब्रुवारीला सकाळी तिच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. तिने एका गोंडस बालकाला जन्म दिला. त्यांनतर काही वेळाने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाल्याने सुवर्णाला प्रचंड वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांनी तिची गर्भपिशवी काढली. मात्र तरीही रक्तस्त्राव थांबला नाही. सुवर्णा सरोदेला वेदना असह्य होऊ लागल्याने डॉक्टरांनी तिला सायन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र डॉक्टरांनी कोणतीही कल्पना न देता सुवर्णाची गर्भ पिशवी काढल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. आज मध्यरात्री दीडच्या सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.