प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे महंत रामगिरी महाराजांचे बहुतांश व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत, अशी माहिती सिन्नर पोलीस व सायबर सेलने उच्च न्यायालयात दिली.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही माहिती देण्यात आली. या सुनावणीला सिन्नरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऑनलाइन हजर होते. रामगिरी महाराजांचे अजूनही काही व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल, असेही सिन्नरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी खंडपीठाला सांगितले.
आक्षेपार्ह व्हिडीओवर कशाप्रकारे कारवाई करण्यात आली याचा तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सिन्नर पोलीस व सायबर सेलला दिले. यावरील पुढील सुनावणी दोन आठवडय़ांनी होणार आहे.
व्हिडीओ व्हायरल करणाऱयांवर कारवाई झाली पाहिजे
- हा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱयांवर कारवाई झाली पाहिजे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱयांवर कारवाई केली जाईल, अशी हमी पोलिसांनी दिली.
रामगिरी महाराजांना नोटीस
- रामगिरी महाराज यांना नोटीस देण्यात आली आहे. तपासात सहकार्य करणार असल्याचे महाराज यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी खंडपीठाला दिली.
काय आहे प्रकरण
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱया महंत रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत काही याचिका दाखल झाल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.