संतापजनक… प्रशासनाची दिरंगाई; ‘आपला दवाखाना’त बहुतांशी रक्तचाचण्या बंद!

मुंबईतील गोरगरीबांना परवडणाऱ्या दरात औषधोपचार मिळावेत यासाठी पालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मध्ये सध्या बहुतांशी प्रकारच्या रक्तचाचण्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे गोरगरीबांना खासगी प्रयोगशाळांमध्ये रक्तचाचण्या करण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडत आहे. या रक्तचाचण्या करण्यासाठी पालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराचा कालावधी संपल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. पालिकेने वेळेत कंत्राटदाराची नेमणूक केली नसल्यामुळेच गोरगरीबांना आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईच्या झोपडपट्टी भागातील गोरगरीबांना घरापासून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर दर्जेदार आणि मोफत उपचार मिळावेत यासाठी पालिकेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र उपक्रम सुरू केला आहे. मुंबईत 17 नोव्हेंबर 2022 रोजी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी रुग्णांना दंतचिकित्सा, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ञ अशा विविध तज्ञांच्या उपचार, महानगरपालिका दरात एक्स रे, सोनोग्राफी, ईसीजी, सिटी स्पॅन, एमआरआय, मॅमोग्राफी आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

147 चाचण्या मिळतात मोफत

विशेष म्हणजे या ठिकाणी पालिकेकडून खासगी आणि नामांकित प्रयोगशाळांशी करार करून विविध प्रकारच्या 147 चाचण्या मोफत केल्या जात आहेत. ही आरोग्य केंद्रे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे कामावरून उशिरा घरी येणाऱ्या सर्वसामान्यांनाही मोठा फायदा होत आहे. सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे 250 ठिकाणी ही सुविधा सुरू आहे.

पालिका म्हणते…

‘आपला दवाखाना’मध्ये चाचण्यांसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराची मुदत संपली आहे. त्यामुळे नव्याने पंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी काही अत्यावश्यक चाचण्या करण्यात येत असून गैरसोय टाळण्यासाठी चाचण्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सामग्री उपलब्ध करून सँपल घेतले जात आहे. हे सँपल टेस्टसाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नजीकच्या पालिकेच्या दवाखान्यांमध्ये पाठवले जाते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळेही ही स्थिती निर्माण झाल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे.

अशी आहे सुविधा

सध्या कार्यरत असलेल्या ‘आपला दवाखाना’मध्ये पोर्टाकेबिन्समध्ये 85, सुसज्ज इमारतीत 17, नियमित दवाखाने 108 आणि पॉलिक्लिनिक्स 33 याप्रमाणे दवाखाने कार्यरत आहेत. आरोग्य सुविधांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने झोपडीबहुल भागातील प्रत्येक 25 हजार लोकसंख्येसाठी एक दवाखाना, तर अडीच लाख लोकसंख्येसाठी एक पॉलिक्लिनिक अशा पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन सत्रांमध्ये दवाखान्याची सेवा रुग्णांसाठी उपलब्ध असून या दवाखान्यांच्या ठिकाणी सेवा पुरविण्यासाठी 1 हजार 140 कर्मचारी कार्यरत आहेत.