पालिका मुख्यालयात डासांची भुणभुण; सुरक्षा रक्षकांना डेंग्यू, मलेरियाचा ‘ताप’; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

संपूर्ण मुंबई महानगरीचा कारभार हाकला जाणाऱ्या महापालिकेच्या पर्ह्ट येथील मुख्यालयातच सध्या डासांचा उपद्रव वाढल्याचे समोर आले आहे. सायंकाळच्या सुमारास डासांचा उपद्रव वाढत असल्याने यावेळी डय़ुटीवर असणाऱ्या विशेषतः सुरक्षा कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहेत. त्यामुळे सुरक्षा कर्मचार्यांना डेंग्यू, मलेरियासारखे आजारही होत आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिसासिक इमारतीला प्रमुख द्वारांच्या एंट्री पॉइंटच्या ठिकाणी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांचा 24 तास पहारा असतो. मुख्यालयात सुमारे 60 सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली असून सुरक्षा कर्मचारी साधारणतः तीन पाळ्यांमध्ये काम करीत असतात. या कर्मचाऱ्यांना अगदी दरवाजावरच डय़ुटी करावी लागत असल्याने त्यांना डासांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याबाबत काही सुरक्षा रक्षकांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर कीटकनाशक विभागाकडून काही प्रमाणात धुम्रफवारणी करण्यात आल्याचे सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आले.

अडगळ, अस्वच्छतेमुळेच डास वाढले

मुख्यालयाच्या एंट्री पॉइंटवर परिणामकारकरीत्या स्वच्छता केली जात नाही. या ठिकाणी अडगळीचे सामानही पडून असते. त्यामुळे डास वाढण्यास मदत होत असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली तरी योग्य ती कारवाई होत नसल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.