गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आपापल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या पाच दिवसांत रवाना झाले आहेत. तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त बसेसद्वारे एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एसटी महामंडळाने 3 ते 8 सप्टेंबर या काळात चालवलेल्या या वाहतुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूककोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणींवर मात करत एसटी प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांतील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल पाच हजार बसेसद्वारे अडीच लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. विशेष म्हणजे राज्यभरातील विविध आगारांतून आलेले 10 हजारांपेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात किरकोळ अपघात वगळता एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली.
कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेसना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात 100 बसेस तैनात ठेवल्या होत्या. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात आली होती.
परतीच्या आरक्षणाला चांगला प्रतिसाद
12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या परतीच्या वाहतुकीसाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागातील आगारातून गट आरक्षण व व्यक्तिगत आरक्षणालादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.