एक लाखाहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱया गुणवत्ता यादीसाठी 1 लाख 75 हजार 8 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी केवळ 73 हजार 438 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. तब्बल 1 लाख 1 हजार 570 विद्यार्थ्यांना अद्याप अकरावीत प्रवेश मिळाला नसून त्यांना आता तिसऱया म्हणजेच शेवटच्या प्रवेश फेरीची वाट पाहावी लागणार आहे.

अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. या यादीसाठी एकूण 1 लाख 93 हजार 792 जागा उपलब्ध होत्या. तर एकूण 1 लाख 75 हजार 8 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. यापैकी 73 हजार 438 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. यात 20 हजार 30 विद्यार्थ्याना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले असून या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. हा प्रवेश नाकारल्यास किंवा न घेतल्यास विद्यार्थ्यांना पुढील म्हणजेच शेवटच्या फेरीत प्रवेशाची संधी मिळणार नाही.

दुसऱया यादीनंतर 1 लाख 20 हजार जागा रिक्त
दुसऱया गुणवत्ता यादीनंतर अकरावीच्या 1 लाख 20 हजार 354 जागा अद्याप रिक्त आहेत. या जागांमध्ये कोटय़ातील सरेंडर होणाऱया जागांची भर पडू शकते. त्यामुळे तिसऱया यादीसाठी रिक्त जागांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

– दुसऱया यादीत कॉलेज अलॉट झाल्यास प्रवेश घेण्यासाठी 10 ते 12 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
– प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांनी लॉगिनमध्ये proceed to admission वर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत व कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा.
– तसेच प्रवेश घ्यायचा नसेल तर विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीसाठी वाट पाहू शकतात, मात्र दुसऱया यादीनंतर नियमित प्रवेशाची केवळ एकच फेरी होणार आहे.
– दुसऱया यादीतील निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास विद्यार्थी कॉलेजला विनंती करून प्रवेश रद्द करू शकतो.
– मात्र अशा प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील एका नियमित फेरीत प्रवेशाची संधी मिळणार नाही. पुढे नियमित प्रवेशाची केवळ एकच फेरी होणार आहे.

कॉलेज        आर्टस   कॉमर्स    सायन्स
एच. आर        –       92.4        –
झेवियर्स       92.8      88       89.6
केसी          85       91.2      86.4
जयहिंद       89.2    91.2      87.4
रुईया         91.6      –         92.4
पोदार          –        94.2        –
रुपारेल       84.8   90.2      90.8
एसआयईएस  –        86.4        –
साठय़े        78.6    88.8      89.6
डहाणूकर      –       90.4        –
भवन्स        79.6   88.6      88.8
मिठीबाई     88      90.4      88.2
एन.एम.       –       92.4        –
वझे-केळकर  88     92         92
मुलुंड कॉलेज –       91.8        –