>> सुनील उंबरे
कार्तिकी एकदशीच्या सोहळ्यासाठी विविध राज्यातून पाच लाखांहून अधिक वारकरी भाविकांनी पंढरपूर मध्ये आपली हजेरी लावली आहे. टाळ मृदुंगाचा मधुर निनाद आणि हरिनामाच्या जयघोषाने श्री विठुरायाची पंढरी नगरी भक्ती रसात चिंब चिंब झालेली पाहायला मिळत आहेत.
कार्तिकी एकादशीची आजची शासकीय महापूजा ही पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचे हस्ते पार पडली.
वास्तविक कार्तिकी एकादशीची महापूजा ही राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे हस्ते पार पडते. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने, पूजेला निर्बंध लागले आहेत.
आजच्या महापुजेत वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून बाबुराव बागसरी सगर व सागरबाई बाबुराव सगर या माळकरी दांपत्याला मान मिळाला. सगर दांपत्य हे उदगीर जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून, गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मागील 14 वर्षापासून पंढरपूरची वारी करीत आहेत. त्यांना दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. मानाचा वारकरी निवड करण्याची प्रक्रिया व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, राजाराम ढगे यांनी पार पाडली.