निवडणूक झाली आता लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर आर्थिक भार पडतो असे विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. आता हा भार कमी करण्यासाठी लाडक्या बहीण योजनेपैकी 60 लाख लाभार्थी महिलांना या योजनेतून हटवले जाणार आहे.
हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. राज्यात दोन कोटी 46 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून 1500 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात. यामुळे सरकारला महिन्याकाठी 3 हजार 690 कोटी रुपये खर्च करावे लागतात. आता यापैकी 25 टक्के महिलांना वगळण्याची तयारी राज्य सरकराने केली आहे, त्यामुळे महिन्याला सरकारचे 900 कोटी रुपये वाचतील असे सांगितले जात आहे.
लाडकी बहीण योजनेसोबत लाभार्थी आणखी कुठल्या योजनेचा लाभ घेत आहेत याची सरकार तपासणी करणार आहे. संजय गांधी निराधार योजनेतून 25 लाख महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. तसेच नमो शेतकरी योजनेतून दर महिन्याला 94 लाख लाभार्थ्यांना एक हजार रुपये दिले जातात. या योजनांशिवाय शेतीची अवजारं विकत घेण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं जातं. हे अनुदान घेणारे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत का याचाही तपास केला जाणार आहे.
1जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेची सुरूवात झाली. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेची सहा हफ्त्यात 321 हजार 600 कोटी रुपये सरकाराने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. राज्यात 18.18 लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. तर 1.71 लाख महिलांना शेतकरी शेती अवजारांसाठी अनुदान दिले जाते. या सर्व महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाईल अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे.
याशिवाय वाहतूक विभागाकडेही एक जबाबदारी देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे दुचाकी किंवा चारचाकी आहे का याचा तपास वाहतूक विभाग करणार आहे. या शिवाय सर्व लाभार्थी महिलांची ई केव्हायसी केली जाईल. यातून कुठली महिला आयकर तर भरत नाही ना याची छाणनी केली जाईल.
ज्या महिला अपात्र ठरतील त्यांच्याकडून खात्यात जमा झालेले पैसे परत घेतले जातील असे विभागाने म्हटले आहे. आपण एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेत नाही असे महिला लाभार्थ्यांकडून लिहून घेततले जाईल अशी माहितीही महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.