मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या सौदी अरबमधील मक्का-मदिना येथे दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. यंदाही लाखोंच्या संख्येने हजयात्रेकरू येथे जमले आहेत. मात्र सौदी अरबमध्ये उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत असून पारा 52 अंशावर पोहोचला आहे. वाढत्या तापमानाचा हज यात्रेवरही परिणाम दिसून येत आहे. हज यात्रेसाठी आलेल्या भाविकांपैकी तब्बल 550 यात्रेकरूंचा उष्णाघाताने मृत्यू झाला असून 2 हजारांहून अधिक लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मक्केजवळील अल-मुआइसम रुग्णालयाच्या शवागारातून ही आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, उष्माघाताने मृत्यमुखी पडलेल्यांपैकी सर्वाधिक लोकं इजिप्तचे आहेत. 550 पैकी जवळपास 332 भाविक हे इजिप्तचे नागरीक आहेत. या सर्वांचा उष्णाघाताने मृत्यू झाला असून एक जण गर्दीत चेंगराचेंगरीमुळे दगावला, अशी माहिती सौदीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हज यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांपैकी आतापर्यंत 577 जणांचा उष्णाघाताने मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मयत इजिप्तचे असून त्याखालोखाल जॉर्डनचे 60 आणि अम्मानचे 41 या देशांचा नंबर लागला आहे. याव्यतिरिक्त आणखी बऱ्याच देशांनी उष्माघाताने मृत्यू झालेल्या नागरिकांची आकडेवारी दिली आहे.
पारा 52 अंशांवर
सौदी अरबमधील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवामान बदलाचा परिणाम मक्का-मदिनेतील वातावरणावरही होत आहे. हज यात्रेवरही याचा परिणाम होत आहे. येथील सरासरी तापमान 0.4 अशांनी वाढत असून 17 जून रोजी मक्का येथील ग्रँड मशिदीच्या परिसरात 51.8 अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे या भागात पाण्याचे फवारेही लावण्यात आले असून यात्रेकरुंनी छत्रीचा वापर करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गतवर्षी पेक्षा तिप्पट आकडा
दरम्यान, गेल्या वर्षी मक्का-मदिना येथे गेलेल्या 240 यात्रेकरूंचा उष्णाघातासह विविध कारणांनी मृत्यू झाला होता. यातील बहुतांश नागरिक इंडोनेशियाचे होते. यंदाही येथील तापमान वाढल्याने गेल्या वर्षीपेक्षा तिप्पट लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे यात्रेकरूंच्या सेवेेसाठी स्वयंसेवक पाण्याच्या बाटल्या घेऊन उभे आहेत. तसेच यात्रेकरांनी थंडगार पेय आणि आईस्क्रीमही दिले जात आहे. यासह उन्हात फिरणे टाळा असा सल्लाही दिला जात आहे.