
>>दीपक पवार
मुंबईत जीबीएसवरील उपचारासाठी दरवर्षी 50 हून अधिक मुले विविध रुग्णालयांत उपचारासाठी येत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनानंतर जीबीएस अर्थात गुलेन बॅरी सिंड्रोमचे अनेक रुग्ण पुण्यापाठोपाठ मुंबईत या आजाराचे रुग्ण समोर येऊ लागले. मुंबईत यामुळे एकाचा बळी गेला आहे. तसेच, अनुवांशिकता, रोगप्रतिकारक शक्ती, दूषित अन्न-पाणी अशा कारणांमुळे या आजाराने त्रस्त असलेल्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. मुलांचे वेळीच लसीकरण करणे, सकस आहार आणि बाहेरचे खाणे टाळून याचा प्रतिकार करता येऊ शकेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
केईएम रुग्णालयात दरवर्षी 1 ते 12 वर्षे वयोगटातील 15 ते 20 मुले जीबीएसवरील उपचारासाठी रुग्णालयात येत असल्याचे रुग्णालयातील बालरोग चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद तुलू यांनी सांगितले. हे रुग्ण बरे होऊन घरीही जातात. परंतु, काहींना व्हेंटीलेटरची गरज भासते.
केईएममध्ये समर्थ भाडंगे हा 10 वर्षांचा मुलगा 21 जून 2024 रोजी रुग्णालयात दाखल झाला. तर आयुष गुप्ता हा दीड वर्षांचा मुलगा 28 डिसेंबर 2024 रोजी रुग्णालयात दाखल झाला. यातील समर्थला व्हेंटिलेटरची गरज भासते. तर आयुष आयसीयूमध्ये असून त्याला तेथून बाहेर येण्यासाठी दोन ते आठवडे जातील, अशी माहिती डॉ. तुलू यांनी दिली.
80 टक्के मुले बरी होतात
जीबीएसमुळे मुलांचे स्नायू आणि मज्जातंतू कमजोर होतात. तसेच जठरावरही याचा परिणाम होतो. आजारात ओटो अँटीबॉडी म्हणजेच शत्रूपेशी आपोआप तयार होतात आणि मुले पायातून पॅरालाईज होतात. त्यांना चालता येत नाही. श्वसनसंस्थेवर हल्ला केल्यामुळे श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास जाणवतो. त्यामुळे व्हेंटिलेटरची गरज भासते, असे डॉ. मिलिंद तुलू यांनी सांगितले. यातील 80 ते 90 टक्के मुले बरी होतात. तर 10 ते 20 टक्के रुग्णांचे स्नायू बळकट होत नाहीत, असे ते म्हणाले.
48 तासांत निदान गरजेचे
जीबीएसचे निदान झाल्यानंतर 48 तासात झाल्यास उपचार करणे आवश्यक असते. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. उशिरा निदान झाले तर बरे होण्यासाठी सहा महिनेही जातात, अशी माहिती जेजे रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुशांत माने यांनी दिली. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना हा आजार होण्याचा अधिक धोका संभवतो, असे शीव रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत गभाळे यांनी सांगितले.
जीबीएसचे व्हेरीयंट
अमान – अॅक्युट मोटर अॅक्सोनल न्यूरोपॅथी
अमसान – अॅक्युट मोटर सेन्सरी अॅक्सोनल न्यूरोपॅथी
मिलर फिशर सिंड्रोम
आयुष्यभर व्हीलचेअरवरही जातात
अनेक मुले आयुष्यभरासाठी व्हीलचेअरवरही जाऊ शकतात. अनेकांच्या हातापायातील ताकद जाते. त्यांना जेवता येत नाही, अन्न गिळता येत नाही, हात वर उचलता येत नाही, अशी माहिती नायर रुग्णालयातील बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक डॉक्टर सुरभी राठी यांनी दिली.
कुठल्या रुग्णालयात किती मुले
केईएम 15 ते 20
सायन 15 ते 20
जेजे 10 ते 15
नायर 8 ते 10