ईव्हीएम मशीनवर 400 उमेदवारांचे मतदान घेता येते. पण त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास त्या मतदारसंघात ईव्हीएमऐवजी मतदान पत्रिकेवर (बॅलेट पेपरवर) मतदान घेतले जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती चोक्कलिंगम यांनी दिली.
मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून 500 हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आला आहे.
निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी कक्ष
z आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरिता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
z उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरू करण्यात येईल. मात्र नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करण्यात येणार आहे.
z लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 95 लाख रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु. 40 लाख इतकी आहे.
आचारसंहिता लागू
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता महाराष्ट्रात आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर यावर निर्बंध घालण्यात येत असल्याची माहिती एस. चोक्कलिंगम यांनी दिली.