दीड दिवसाच्या बाप्पाला रविवारी वाजतगाजत निरोप दिल्यानंतर बुधवारी पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि चौकाचौकावर ढोलताशांचा गजर सुरू होता. भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषाने संपूर्ण मुंबई दणाणून गेली. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना बच्चेकंपनी भावुक झाली होती. गणेशभक्तांच्या गर्दीने चौपाट्या हाऊसफुल्ल झाल्या होत्या. शहर व उपनगरात रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 14 हजार 381 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
विघ्नहर्ता गणरायाचे शनिवारी आगमन झाल्यामुळे शहरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर बुधवारी पाच दिवसांच्या गणरायाचे धूमधडाक्यात विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळी पालिकेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव परिसरात गणपती विसर्जनासाठी भाविकांनी दुपारपासून गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समुद्र, तलाव आणि कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन शांततेत पार पडले. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजेपर्यंत एकूण 14 हजार 381 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात शहर व उपनगरांतील 213 सार्वजनिक, 14,168 घरगुती अशा एकूण 14,381 गणेशमूर्तींचा समावेश आहे. यात कृत्रिम तलावांत 80 सार्वजनिक तर 6480 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गुरुवारी गौरी- गणपतीचे तर शुक्रवारी सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार असल्याने पुढील दोन दिवसदेखील चौपटय़ांवर भाविकांची गर्दी असणार आहे.