
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील हनी ट्रॅप प्रकरणात एका प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडीओ चित्रित केला. त्या आधारे ब्लॅकमेल करून प्रतिष्ठित व्यक्तीकडून चोपडा तालुक्यातील लोणी अडावद येथील ‘प्रतिभा’ नामक महिलेने लाखो रुपये उकळल्याची घटना नुकतीच समोर आली. या घटनेने परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली. अशा या हनी ट्रॅप प्रकरणात आणखी बरेच जण अडकल्याची मोठी चर्चा परिसरात सुरू आहे. सदर महिलेने रावेर शहरातील 43 वर्षीय व्यक्तीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख रुपये उकळले होते. या महिलेकडून पाच कोटी रुपये हात उसने घेतल्याच्या खोट्या पावतीचा नोटरी करारनामा 21 फेब्रुवारी 2025 रोजी सदर व्यक्तीकडून करून घेतला. यासंदर्भात संबंधित प्रतिष्ठित धनदांडग्या व्यक्तीने नेहमीच्या ब्लॅकमेलिंगच्या प्रकाराला कंटाळून अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी ‘त्या’ ब्लॅकमेलर महिलेला अटक केली. तसेच तिचा मुलगा निर्मल चुन्नीलाल पाटील यालाही अटक केली. पोलीस तपासादरम्यान महिलेकडून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस कसून तपास करीत असून पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलमधून पोलीस तपासात अनेक अश्लील व्हिडीओ, फोटो, संभाषण असे अनेक पुरावेही सापडले आहेत.
व्यापाऱ्यांसह डॉक्टर, वकील, अधिकाऱ्यांचा समावेश
या महिलेच्या मोहजालात अनेक व्यापाऱ्यांसह डॉक्टर, वकील, सरकारी अधिकारी, माजी नगरसेवक, वन व पोलीस विभागाचे काही कर्मचारी, व्यावसायिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यासह प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्ती असे एकूण 100 जण असल्याचे सांगितले जात आहे.