इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्ध आणखी तीव्र होत चालले आहे. इस्रायल सातत्याने लेबनॉनवर हल्ले करत आहे. दरम्यान, इस्रायलने आत्तापर्यंत दक्षिण लेबनॉनमधील 130 शहरे आणि गावांमधून हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना पळवून लावले आहे. त्यानंतर इस्रायलने लेबनॉनमध्ये आणखी सैन्य पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
उत्तर सीमेवर झालेल्या हल्ल्यात इस्रायलचे दोन राखीव सैनिक ठार झाले आहेत. मास्टर सार्जंट एटे अझुले (25) आणि वॉरंट ऑफिसर अवीव मेगन असे या सैनिकांची नावे आहेत. दोघेही इस्रायली संरक्षण दलाच्या एलिट 5515 कॉम्बॅट मोबिलिटी युनिटचे सदस्य होते. या हल्ल्यात आणखी एक सैनिक गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे वृत्त आज तक या वाहिनीने दिले आहे.
इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये मोठ्या युद्धासाठी तयारी केली असून त्यांनी आणखी काही सैनिक मैदानात उतरवले आहेत. म्हणजे हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लेबनॉनमध्ये इस्रायलच्या सैन्याकडून मोठी कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, हिजबुल्ला उत्तर इस्रायलच्या दिशेने सातत्याने हल्ले करत आहे.
6 ऑक्टोबर 2024 च्या रात्री इस्रायल तिसरी डिव्हिजन लेबनॉनमध्ये दाखल झाली आहे. यादरम्यान लेबनॉनमध्ये हजारो इस्रायली सैनिक युद्धात सहभागी झाले आहेत. गरज वाटली तर आम्ही सैन्याची संख्या आणि हल्ले वाढवत राहू, असे इस्रायलने स्पष्ट केले. दरम्यान अजून 10 हजारांहून अधिक इस्रायली सैनिक युद्धासाठी तैनात करण्यात आले आहेत.