उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कटघर भागात एका प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण असून आजूबाजूला धुराचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीतून निघणाऱ्या धुरामुळे श्वास घेणे कठीण होत आहे.
ज्या कारखान्याला आग लागली त्यामध्ये प्लास्टीकचे पाईप बनवले जात होते. या आगीतून निघणाऱ्या धुराच्या लोटांमुळे आजूबाजूच्या परिसरात श्वास घेणे कठीण होत आहे. मुरादाबादचे जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. आग पसरत असल्याने जवळच्या परिसरातून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. मुरादाबादचे जिल्हा दंडाधिकारी अनुज कुमार यांनी सांगितले की, अद्याप किती लोकं आत अडकले आहेत हे स्पष्ट झालेले नाही आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ड्रोन कॅमेरा मागवण्यात आला आहे आणि ड्रोनच्या मदतीने आगीच्या प्रसाराचा अंदाज घेतला जात आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत.
मुरादाबादचे एसएसपी सतपाल अंतिल म्हणाले की, या कारखान्यात प्लास्टिकचे पाईप आणि टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. आगीची माहिती मिळताच पोलिस-प्रशासन, अग्निशमन सेवा आणि रुग्णवाहिका गाड्या घटनास्थळी पोहोचले. आतापर्यंत आग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे आणि अग्निशमन सेवेच्या डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत. कारखान्याच्या मालकाने माहिती दिली की, आत कोणीही अडकलेले नाही, एक चौकीदार त्याच्या कुटुंबासह तिथे राहत होता ज्याला बाहेर काढण्यात आले आहे.