मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 30 हजार, एसटी चालकाला फक्त 12 हजार? विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्ला

एसटी महामंडळ कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्यांवरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 30 हजार रुपये पगार देता आणि एसटीचालकाला फक्त 12 हजार रुपये? लाज वाटली पाहिजे सरकारला, असे म्हणत प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. विरोधकांनी एसटी कर्मचाऱयांचे विविध मुद्दे प्रभावीपणे मांडत परिवहन मंत्र्यांना धारेवर धरले.

एसटी कर्मचाऱयांची वेतनवाढ, महागाई भत्ता व घरभाडे आदी मुद्दय़ांबाबत विधानसभेत आज तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर सविस्तर चर्चा झाली. परिवहन मंत्री दादा भुसे यांनी काही आकडेवारी सादर करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधकांनी त्यांना अनेक मुद्दय़ांवरून घेरले. आमदार बच्चू कडू यावेळी म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष आणि मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 25 ते 30 हजार रुपये पगार दिला जातो. तो एसी गाडीतून फिरतो, पण भरउन्हात जनतेची सेवा करणाऱया एसटी महामंडळाच्या चालकाला फक्त 12 हजार रुपये पगार देता? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानला फाडला होता तो अशाच अन्यायासाठी. सरकार अन्याय का करतेय? असा सवाल कडू यांनी केला. किमान वेतन कायद्यानुसार 14 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार दिला पाहिजे, पण सरकारच कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या मारायची? सरकारला राग का येत नाही? असा जाब विचारतानाच, लाज वाटली पाहिजे सरकारला, असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

एसटीचे 4 हजार 849 कोटी रुपये सरकारकडे बाकी – वैभव नाईक

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एसटी कर्मचाऱयांना अनेक महिने घरभाडेही मिळालेले नाही असे निदर्शनास आणले. तसेच एसटी महामंडळाची 4 हजार 849 कोटी रुपये थकबाकी सरकारकडे आहे असेही त्यांनी सांगितले. 9 ऑगस्टला एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलन करणार आहेत, ते स्थगित करण्यासाठी सरकारने
काय उपाय केलेत अशीही विचारणा त्यांनी केली.

डेपो बनवून तयार, पण एसटीच नाही – रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावेळी आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात एसटी डेपो बनवून तयार असूनही तिथे बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत असे सांगितले. पुढच्या 20 दिवसांत तिथे बसेस चालू करा अशी मागणी त्यांनी केली. दर महिन्याला एसटी महामंडळाला 320 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय झाला होता, परंतु तो पूर्ण निधी दिलाच जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

एसटी कर्मचाऱ्यांची अवहेलना का? – बाळासाहेब थोरात

पगारसुद्धा वेळेवर नाही मिळत. इतकी एसटी कर्मचाऱयांची अवहेलना का, असा प्रश्न काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी केला. 50 गाडय़ा जिथे हव्यात तिथे 25 गाडय़ाही नाहीत आणि आहेत त्यासुद्धा चांगल्या अवस्थेत नाहीत अशी एसटीची दुरवस्था आहे. एसटी सेवा ही सर्वसामान्य जनतेशी निगडित आहे, मग तिच्याकडे दुर्लक्ष का, असेही ते म्हणाले. मंत्री भुसे यांनी एसटी महामंडळाला सरकारकडून 887 कोटी रुपये देणे बाकी असल्याची कबुली दिली. या चर्चेत काँग्रेसचे विश्वजीत कदम, शिवसेनेचे भास्कर जाधव यांनीही भाग घेतला.