Monsoon 2024 Update : गुड न्यूज! महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; सरीवर सरी बरसणार, हवामान विभागाने दिली अपडेट

उन्हाच्या काहिलीने आणि दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्रात वरुणराजाचे आगमन झाले आहे. हवामान विभागाने ही शुभ वार्ता दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात एन्ट्री केल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आज 6 जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाले आहे. कोकणातील रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम, विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत मान्सून पोहोचला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

तसेच तळ कोकण, घाटमाथ्यावर आणि दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढील 24 तासांत पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने उपग्रहाद्वारे घेतलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मान्सूनने दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील बराचसा भाग व्यापल्याचे दिसत आहे.

उपग्रहाद्वारे आज सकाळी हा फोटो काढण्यात आला आहे. यात केरळच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि महाराष्ट्रात तळ कोकणावर मान्सूनचे ढग आल्याचे दिसत आहे. मान्सून पश्चिम भागात पुढे सरकण्यासाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण तयार झाले आहे. आणि चांगला संकेत आहे. यासोबतच पूर्व किनारपट्टीही मान्सूनने व्यापल्याचे दिसत आहे, अशी माहिती के. एस. होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे