सुमारे तीन हजार गुंतवणूकदारांची 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या मनीएज ग्रुप कंपनीच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील दोघा संचालकांविरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. आरोपी संचालकांपैकी दोघांना आधीच अटक करण्यात आली असून दोघा संचालकांना अटक होणे बाकी आहे. ते दोघे देशाबाहेर पळून जाऊ नये याकरिता लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
मनीएज ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक आणि भागीदारांनी गुंतवणूक केल्यास पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विसेसच्या माध्यमातून 24 टक्क्यांनी वार्षिक परतावा मिळेल असे आमिष नागरिकांना दाखवले होते. त्याला बळी पडत राहुल पोद्दार व त्यांच्या ओळखीच्या लोकांनी कोटय़वधीची गुंतवणूक केली होती. याशिवाय अन्य हजारो गुंतवणुकदारांची देखील फसवणूक झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल करून हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रणव रावराणे यांना अटक केली होती. मात्र अन्य दोन आरोपी संचालक प्रिया प्रभू आणि राजीव जाधव हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे प्रिया आणि राजीव देशाबाहेर पळून जाऊ नये याकरिता त्यांच्याविरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
16 बँक खाती गोठवली
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने या प्रकरणात कंपनी व आरोपींची मिळून 16 बँक खाती गोठवली आहेत. या बँक खात्यात किती पैसा आहे हे समजू शकले नाही.
पोलिसांनी कंपनीच्या मुलुंड येथील कार्यालयाची तसेच अटक केलेल्या दोघा आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत पोलिसांच्या हाती काही कागदपत्रे लागली असल्याचे समजते. मुलुंड येथील कार्यालय गेल्या सहा महिन्यांपासून बंद होते, असेही समजते. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.