कोटय़वधींच्या मनीएज आर्थिक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 19 सदनिका, बदलापूर येथील 10 दुकाने आणि विविध ठिकाणच्या 25 एकर जमीन जप्त केल्या आहेत. आणखी कारवाई करण्यात येईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
सुमारे तीन हजार गुंतवणूकदारांची मनीएज ग्रुप ऑफ कंपनीमध्ये 100 कोटींची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार असून पोलीस या गुह्याचा सखोल तपास करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणाशी संबंधित ठाणे, विरार व आजूबाजूच्या परिसरात असलेल्या 19 सदनिका, बदलापूर येथील 10 दुकाने तसेच श्रीवर्धन, पाली, शहापूर येथील तब्बल 25 एकर जमीन आतापर्यंत पोलिसांनी जप्त केल्या आहेत. श्रीवर्धन येथील पाच एकर, पाली येथील तीन ठिकाणच्या मिळून 11 एकर आणि शहापूर येथील नऊ एकर जमिनींचा समावेश आहे. शहापूर येथील जप्त जमिनीमध्ये बागायती आणि बिगर बागायती जमिनीचा समावेश आहे.
250 गुंतवणूकदार पुढे आले; 40 कोटींवर आकडा
या प्रकरणात आतापर्यंत 250 गुंतवणूकदार पुढे आले आहेत. त्या सर्वांची मनीएजमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार आहे, तर या गुंतवणूकदारांना तक्रारीनुसार आतापर्यंत फसवणुकीचा आकडा 40 कोटी इतका झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.