राजस्थानात अवतरली पैशांची कार; 1 रुपयाच्या नाण्यांची सजावट सोशल मीडियावर व्हायरल

दुचाकी असो की चारचाकी कार, प्रत्येक जण आपल्या वाहनांची विशेष काळजी घेत असतो. आपल्या वाहनाची सर्व्हिसिंग करणे, तिला जास्त वेळ उन्हात उभी न करणे, दुसऱ्यांच्या हाती सोपवताना मनातून नाराज होणे हे अनेकदा पाहायला मिळते. परंतु राजस्थानमधील एका व्यक्तीने आपल्या कारला आकर्षक स्टिकर्सने न सजवता थेट एक रुपयाच्या नाण्यांनी सजवली आहे.

एखाद्या कारला नाण्यांनी चिपकवून सजवलेले हे पहिल्यांदाच घडले आहे. त्यामुळे या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. या कारला भरउन्हात उभी करण्यात आले आहे. गाडीच्या बाहेरच्या पार्टस्वर पांढरी पट्टी लावून अगदी मोजमाप करून कुठेही नाणे मागे-पुढे झाले नाही याची काळजी घेऊन अगदी व्यवस्थित नाणी बसवून घेतली आहेत. त्यामुळे सूर्यप्रकाश पडल्याने कारवर लावलेली एक रुपयाची नाणी खूपच चमकत आहेत. यामुळे कारला एक वेगळाच लुक आला आहे. अनेकदा कार खरेदी करताना ग्राहक गाडीचा कलर पाहतात. कोणाला पांढरा रंग, कोणाला काळा, लाल तर कोणाला निळ्या रंगाची कार आवडते. कार खरेदी केल्यानंतर त्यातील अनेक जण त्या कारला मॉडीफाय सुद्धा करतात.

भन्नाट आयडिया

नवीन कार खरेदी केल्यानंतर अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाचे स्टिकर्स गाडीवर लावतात. परंतु राजस्थानमधील या व्यक्तीने भन्नाट आयडिया शोधली आहे. त्याने एक रुपयाच्या असंख्य नाण्यांनी आपल्या कारची सजावट केली आहे. कारवर पहिल्यांदा नाणे चिकटवले असल्याने कारची चमक वाढली आहे. ही कार उन्हात धावताना आणखी जास्त चमकते. रस्त्यांवरून जाताना अनेकांचे लक्ष वेधून घेते. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.