>> संजीव साबडे
जे जे चांगले ते ते खावे या उक्तीनुसार आपण आपलासा केलेला पदार्थ म्हणजे मोमो. हा खूप महाग नाही आणि गरमच दिला जात असल्याने सोबतच्या सॉससोबत तो चटपटीत लागतो. तो असंख्य रेस्टॉरंटमध्ये जसा मिळतो, तसाच फूटपाथवरील टपरी वा हातगाडीवरही मिळतो. तुलनेने स्वस्त असा मोमो तिबेट, नेपाळ, भूतान, लडाख, बंगाल, ईशान्येकडील राज्यं आणि आता भारतात अतिशय लोकप्रिय आहे.
आपण मराठी मंडळी खाद्यपदार्थांच्या बाबतीत खूप सहिष्णू आहोत. आपल्याकडे कुठेही इडली, डोसा, वडा मिळतो आणि तो आपण आनंदाने खातो. छोले भटुरे आणि मक्के की रोटी नि सरसो का साग हे पंजाबी पदार्थ सहज मिळतात आणि आपण आवडीने खातो. गुजराती थाळी, खमण ढोकळा राजस्थानी थाळी, डाल बाटी मुंबईत मिळते आणि ते पदार्थ आपण बऱयाचदा खातो. बंगाली जेवण, खाद्यपदार्थही अनेक ठिकाणी मिळतात आणि मराठी लोक मनापासून ते खातात. इतकंच काय, अवधी, मुगल आणि चायनीज, मेक्सिकन, अफगाणी पदार्थांवरही आपण ताव मारतो. यात काही गैर नाही. पण तामीळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश किंवा पंजाब, बंगाल, राजस्थान, ओडिशामध्ये तुम्हाला साबुदाणा खिचडी, पोहे, मसालेभात किंवा अगदी वडापावही मिळत नाही. साबुदाणा तर तिथे अनेकांना माहीतच नसतो. पण मराठी लोकांनी आणि राज्यातील शहरे व छोटय़ा गावांनी देशभरचे खाद्यपदार्थ आपलेसे केले आहेत.
असाच एक खाद्यपदार्थ गेल्या काही वर्षांत फक्त मुंबईतच नव्हे, तर राज्याच्या बहुसंख्य भागात दिसू व मिळू लागला आहे. आपण तो सहजपणे खाऊ लागलो आहोत. जे जे चांगले ते ते खावे या उक्तीनुसार आपण तो प्रकार आपलासा केला आहे. तो असंख्य रेस्टॉरंटमध्ये जसा मिळतो, तसाच फूटपाथवरील टपरी वा हातगाडीवरही मिळतो. हा खूप महाग नाही आणि गरमच दिला जात असल्याने सोबतच्या सॉससोबत तो चटपटीत लागतो. होय, तोच तो तिबेटी, नेपाळी, भुतानी, लडाखी, बंगाली आणि ईशान्येकडील राज्यांत अतिशय लोकप्रिय असलेला आणि तुलनेने स्वस्त असा मोमो. मोमो मूळचा तिबेटचा.
मोमो तिबेटी लोकांबरोबर 60 वर्षांपूर्वी भारतात आला, त्याला 60 वर्षं होऊन गेली. पुढे काही स्थानिक नेपाळी व तरूणांनी हे मोमोज रस्त्यावरील स्टॉल आणि हॉटेलात आणले. जिथे तिबेटी वंशाचे लोक राहतात, अशा सर्व ठिकाणी आपले स्थान भक्कम झाल्यावर मुंबई व महाराष्ट्रासह सर्व राज्यांत मोमो येऊन पटकन स्थायिक झाला. पंजाब व तामीळनाडूमध्ये साबुदाणा खिचडी व बटाटेवडा मिळत नसला तरी मोमो सहज मिळतात. कर्नाटकातील उडियारपलयम गावात तिबेटी लोकांचे 22 कॅम्प आहेत. सुमारे चार हजार तिबेटी लोक तिथे राहतात. बौद्ध मठ, स्तूप, मंदिर, धार्मिक शिक्षण देणाऱया निवासी शाळा आणि चार-पाच तिबेटी रेस्टॉरंटही आहेत तिथे. ते गाव पाहायला देशाच्या विविध भागांतून आलेले लोक तिथे मोमो खात बसले होते. मोमो आणि थुपका!
मोमो म्हणजे भिजवलेल्या गहू वा तांदळाच्या पिठात मीठ व हलक्या मसाल्यासह उकडलेल्या भाज्या वा मटण, चिकन, पोर्क घालून ते गोळे उकडायचे. ते करणे फार अवघड नाही. हे उकडलेले मोमो तसेच शेझवान वा मेयोनीज सॉसमध्ये बुडवून खायचे. म्हणजे हा साधा वाफवून बनवण्याचा प्रकार. त्याला तेल वगैरे लागत नाही. पण आता फ्राईड मोमो लोकांना आवडू लागले आहेत. उकडलेले मोमो फक्त तेलात तळून लाल व काहीसे कुरकुरीत करून दिले जातात. काही मोमोना मोदकांचा आकार असतो. त्याला ‘बाओझी’ असेही म्हणतात. करंजीसारखा आकार असल्यास त्यांना ‘मांडू’ म्हटले जाते. हे मोमो सॉसबरोबर जसे खातात, तसे थुपका नामक नूडल्स असलेल्या सूपमध्ये घालूनही खाल्ले जातात. पण थुपका मोमोची तितकीशी सवय आपल्याला लागलेली नाही. मुंबईतील अनेक ठिकाणी आता व्हेज व चिकन थुपकाही मिळू लागला आहे. मोमो हा विशेषत तरुण मंडळींचा आवडता प्रकार. संध्याकाळी अनेक मोमो स्टॉलपाशी तरुण-तरुणींची गर्दी स्रू होते. काहींचे मोमो फक्त उकडलेले, काहींचे तळलेले, काहींचे व्हेज, काहींचे पनीर तर काहींचे चिकन मोमो. त्यातही प्लेन चिकन व चिली चिकन हे प्रकार. काही ठिकाणी सॉस तर काही ठिकाणी चायनीज ग्रेव्ही असते. ती मोमोवर ओतून मग ते खायचे. फक्त 100 ते 125 रुपयांत 10-12 मोमो मिळतात स्टॉलवर. म्हणजे 10 रुपयांना एक.
मुंबई व ठाण्यात स्टॉल व रेस्टॉरंट मिळून मोमोजची किमान 300 ठिकाणे आहेत. बहुतेक कॉलेजपाशी किमान एक मोमोचा स्टॉल असतो. संध्याकाळी जिथे तरुण जमतात तिथे लगेच मोमोचा स्टॉल दिसू लागतो. तिबेटी, नेपाळी किंवा दार्जिलिंग वा ईशान्येकडील चेहरेपट्टी असलेला एक वा दोनजण मिळून मोमोचा धंदा करतात. मोमो आधीच करून आणलेले असतात. स्टॉलवर ऑर्डरप्रमाणे वाफवायचे म्हणजे गरमागरमच मिळणार. वयस्क मंडळी तिथून पार्सल नेतात. तिखट नसलेले अगदी नरम व मुलायम मोमो ते सहज खाऊ शकतात.
तुम्ही अंधेरीत असाल तर आराम नगरच्या दार्जिलिंग लेपचा आणि आदर्श नगरच्या सेरन्या तिबेटन किचनमध्ये विविध प्रकारचे मोमो मस्त मिळतात. जोगेश्वरी पश्चिमेला सेवेनोसिस (बहुधा सेवन ओएसिस), मालाडच्या मालवणी भागात बॉम्बे मोमोज, चिंचोली बंदर भागात न्यू सेरन्या, कांदिवलीत पांडा मोमोज, बोरिवलीतील ग्रॅब सम मोमोज खूपच लोकप्रिय आहेत. पवई परिसरात सुरज लामा मोमो आणि पवई मोमो सेन्टरमध्ये उत्तम मोमो मिळतात. वाकोला (सांताक्रूझ पूर्व)मध्ये डम्पलिंग खांग, वरळीच्या सेंचुरी बाजार भागात यम्मी मोमोज, मुंबई सेंट्रलला वाव मोमोज, कुर्ल्यात इंडियन मोमोज कंपनी ही उत्तम दर्जाच्या मोमोमुळे लोकप्रिय ठिकाणे बनली आहेत. सायनचे वाव मोमो, प्रतीक्षा नगरमधील माजिक मोमोज आणि कांजूर मार्गचे अपेटाईट मोमोज, ठाण्यातील नवपाडय़ाचे अपेटाईट मोमोज इथे खात्रीने चांगले मोमोज मिळतात. ठाण्यात मोमो नेशन कॅफे, मोमोज हेवन, मॅजिक मोमोज, डम्पलिंग मोमोज या ठिकाणी मोमो खायला व घरी न्यायला संध्याकाळी गर्दी असते.
अर्थात हे मोमोज अधूनमधून खावेत. चायनीज पदार्थांत घालतात, ते मोनोसोडियम ग्लुटामेट मोमोजमध्ये असल्यामुळे ते चवीला मस्त लागतात. पण नेहमी खाल्ल्यास पोटाचे त्रास स्रू होऊ शकतात. तसा कोणताही अतिरेक वाईटच.