मोहित कंबोजने ईव्हीएम घोटाळा केला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार मोहित उत्तम जानकर यांनी केला. तसेच पुढच्या तीन ते चार महिन्यांत हे सरकार पडणार असा दावाही जानकर यांनी केला.
एक व्हिडीओ जारी करत जानकर म्हणाले की, ज्या दिवशी मोहित कंबोजने देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निकालाच्या दिवशी उचलून घेतले. त्या दिवशी कंबोज 120, 120 असा ओरडत होता. हा एक टक्के पुरावा आहे. या मोहित कंबोजचा काय संबंध ? मोहित कंबोज आहे तरी कोण? तरी मी ठामपणे सांगतोय की, या सगळ्या ईव्हीएम मशीन्सची जबाबदारी ज्या व्यक्तीवर सोपवण्यात आली होती, ती चोखपणे पार पाडली तो हा मोहित कंबोज. अजूनही 99 टक्के पुरावे बाकी आहेत. पण या सोबत मी एक क्लिप पाठवत आहेत, त्यात 120, 120 असा ओरडत असून त्याचा आनंद पाहा असे जानकर म्हणाले.
तसेच मोहित कंबोज हा माणूस राजकीय नाही, हा माणूस आमदार नाही, मंत्री नाही. तरीही 120 जागांची जबाबादारी घेणारा हा मोहित कंबोज काय संदेश देत आहे महाराष्ट्राला? हे पाहणं महत्त्वांच आहे, माझा स्वतःवर आत्मविश्वास असून परमेश्वरावर आणि रामाच्या सत्यवचनावर विश्वास आहे. की मी या मुद्द्याच्या तळाशी जाणार. जे खरं आहे तेच टिकणार आणि जे खोटं आहे ते पाण्यासोबत वाहत जाणार. यासाठी तीन महिने किंवा चार महिने लागतील याला फार वेळ लागणार नाही. पण ज्या दिवशी मी या महाराष्ट्रासमोर हे चित्र उभं करेन त्या दिवशी महाराष्ट्र माझ्यासोबत उभा राहिल. आणि राज्यातलं हे सरकार 100 टक्के जाईल. हे सरकार आभाळातून पडले आहे, ज्यांना कुणीही मतं दिली नाहीत, ते सरकार राहणार नाही असेही जानकर यांनी नमूद केले.