![Ratan Tata](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/10/Ratan-Tata-1-696x447.jpg)
जगभर आपल्या उद्योगांची यशोपताका फडकवणारे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. 9 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाला चार महिने पूर्ण होत असताना आता त्यांच्या इच्छापत्रातील माहिती समोर आली आहे. त्यानुसार त्यांनी जवळपास 500 कोटी रुपयांची संपत्ती मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावावर केली आहे. बऱ्याच जणांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकले आहे. त्यामुळे मोहिनी मोहन दत्ता हे नक्की कोण आहेत याची चर्चा सुरू आहे.
रतन टाटा यांच्या इच्छापत्रामध्ये वारसांच्या यादीत मोहिनी मोहन दत्ता यांचे नाव आहे. प्रोबेटचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि उच्च न्यायालयाने प्रमाणित केल्यानंतर त्यांना ही रक्कम मिळणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी साधारण 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे वृत्त ‘द इकोनॉमिक्स टाइम्स’ने दिले आहे.
कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?
रतन टाटा यांच्या इच्छापत्रात नाव असणारे मोहिनी मोहन दत्ता हे जमशेदपूर येथील उद्योजक आहेत. स्टॅलियन कंपनीचे ते सह-मालकही आहेत. त्यानंतर ते टाटा सर्व्हिसेसचा भाग बनले होते. विलिनीकरण होण्याआधी त्यांच्याकडे स्टॅलियनचे 80 टक्के समभाग होते, तर उर्वरित 20 टक्के समभाग टाटा इंडस्ट्रीकडे होते.
रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कावेळी मोहिनी मोहन दत्ता यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबाबत सांगितले होते. रतन टाटा यांना भेटलो तेव्हा मी फक्त 24 वर्षांचा होतो. जमशेदपूरमधील डिलर्स हॉस्टेलमध्ये माझी आणि त्यांची पहिली भेट झाली होती, असे मोहिनी मोहन दत्ता यांनी सांगितले होते.
मोहिनी मोहन दत्ता हे गेल्या 6 दशकांपासून टाटा समूहासोबत आहेत. टाटा कुटुंबाशीही त्यांची जवळचे संबंध आहेत. रतन टाटा यांनीच आपल्याला मदत केली आणि त्यांनी प्रशिक्षितही केले, असे मोहिनी मोहन दत्ता सांगतात.