
पुणे शहराची वाढती मागणी लक्षात घेता जलसंपदा खात्याने 21 टीएमसी पाण्याचा कोटा तातडीने मंजूर करायला हवा. भाजप सरकार यात टाळाटाळ का करत आहे? त्याचा भुर्दंड पुणेकरांना सोसावा लागत आहे, आता तरी मंत्रिमहोदय चंद्रकांत पाटील हे आपले सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाण्याच्या कोट्याबाबत समज देतील काय, असा सवाल काँग्रेस नेते, माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.
पुणे महापालिकेला 14 टीएमसी पाणी कोटा जलसंपदा खात्याने मंजूर केला. परंतु, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हा कोटा वाढविण्याची गरज आहे. ही वाढीव मागणी मंजूर न करता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की, ‘महापालिकेला जादा पाणी वापराबद्दल दंड ठोकू’, हे त्यांचे म्हणणे अन्यायकारक आहे. पुणे शहर हे महानगर म्हणून आकार घेत आहे. गेल्या काही वर्षांत पुण्याची लोकसंख्या 50 लाखांहून अधिक झाली आहे. याची कल्पना जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांना नसावी, याचे आश्चर्य वाटते. महापालिकेला दंड ठोकण्याची भाषा करणाऱ्या जलसंपदा मंत्र्यांना आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री अजित पवार हेही त्यांना माहिती का देत नाहीत? भाजपच्या मंत्र्यांमध्ये विसंवाद आहे. त्याचा परिणाम पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे’, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.
खडकवासला धरण साखळीतून पुण्याला 21 टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यांच्या या मागणीचा त्यांनाच विसर पडला आहे का, असा सवाल देखील जोशी यांनी केला.