जन्मदर 2.1 असल्यास तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो, असे मत रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे दाम्पत्यांनी दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घालावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, लोकसंख्या कमी होणे ही गंभीर बाब आहे. आधुनिक लोकसंख्याशास्त्रानुसार जेव्हा जन्मदर 2.1 पेक्षा कमी होतो याचा अर्थ पृथ्वीवरून तो समाज नष्ट होण्याची शक्यता असते. कुठलेही संकट नसताना तो समाज नष्ट होऊ शकतो. लोकसंख्या नसल्याने अनेक समाज आणि अनेक भाषा नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे जन्मदर 2.1 पेक्षा कमी होता कामा नये. 1998 किंवा 2002 साली आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण ठरलं. त्यात कुठल्याही समाजाचा जन्मदर हा 2.1 पेक्षा कमी असता कामा नये, असे ठरवण्यात आले होते. त्यामुळे कुठल्याही दाम्पत्याला दोन किंवा तीनपेक्षा अधिक अपत्य असायला हवीत. हेच लोकसंख्याशास्त्रात म्हटले आहे. समाजासाठी एवढी लोकसंख्या हवी, असेही भागवत म्हणाले.