…तेव्हा 19व्या मजल्यावरून उडी मारून मोहम्मद शमी आत्महत्या करणार होता! जवळच्या मित्राचा गौप्यस्फोट

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतींनी ग्रस्त आहे. त्यामुळे तो टी20 वर्ल्डकप आणि श्रीलंका दौऱ्यालाही मुकला. या दुखापतीतून तो हळूहळू सावरत असून बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेद्वारे तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे. कसोटी आणि वन डे स्पेशालिस्ट समजल्या जाणाऱ्या शमीसाठी गेले काही वर्ष वादळ घेऊन आले.

कोविड काळामध्ये तर तो पत्नी हसीन जहांच्या आरोपांनी घेरला गेला होता आणि यामुळे त्याच्या मनात आत्महत्येचे विचारही येत होते. इरफान पठाणसोबत इन्स्टाग्राम लाईव्हवर बोलताना याची कबुलीही त्याने दिली होती. त्यावेळी त्यांनी सर्व घडामोडी सविस्तर सांगितल्या नव्हत्या. मात्र आता त्याचा जवळचा मित्र आणि आमदार उमेश कुमार यांनी शमीच्या मनातील त्यावेळच्या चलबिचलीचा गौप्यस्फोट केला आहे.

शुभंकर मिश्रा यांच्या ‘अनप्लग्ड’ या पॉडकास्टवर बोलताना उमेश कुमार यांनी शमीच्या आयुष्यातील वादळावर विधान केले आहे. त्यावेळी शमी प्रत्येक गोष्टीशी लढत होता आणि माझ्या घरीच रहायचा. पाकिस्तानसोबत मॅक फिक्सिंग केल्याचा आरोप त्यावर झाला. त्यावेळी तो आतून तुटला. मी सर्वकाही सहन करू शकतो, पण देशाशी गद्दारी केल्याचा आरोप सहन करु शकत नाही, असे त्याने म्हटले होते. त्याच रात्री त्याला आत्महत्या करायची होती, असे उमेश कुमार यांनी सांगितले.

पहाटे चारच्या आसपास मी पाणी पिण्यासाठी उठलो आणि किचनकडे जाऊ लागलो. त्यावेळी ड्रॉइंग रुमच्या बाल्कनीमध्ये शमी उभा होता. जिथे आम्ही रहात होतो, तो 19वा मजला होता. मी समजून गेलो काय होतंय आणि शमीच्या मनात काय चाललंय. दु:ख, वेदना, त्रास सर्वकाही… ती शमीसाठी कयामतची रात्र होती, असेही उमेश कुमार यांनी सांगितले.

शमीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. त्या दिवशी शमीने एक गोष्ट बोलला होता. मला मारा, शिक्षा द्या, फाशी द्या… या सगळ्यासाठी मी तयार आहे, पण पाकिस्तानसोबत मी मॅच फिक्स केली हा आरोप मला सहन होत नाहीय. त्यावेळी मी त्याची समजूत काढली आणि हे दिवसही निघून जातील असा सल्ला दिला. त्यानंतर काही दिवसांनी त्याला क्लीन चिट मिळाल्याचा फोन आला. तो खुप आनंदात होता. एवढा आनंद कदाचित त्याला वर्ल्डकप जिंकल्यावरही झाला नसता, असेही उमेश कुमार म्हणाले.