राज्याच्या बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला मोहम्मद शरीफुल इस्लामच्या चेहरा पडताळणीचा अहवाल वांद्रे पोलिसांना प्राप्त झाला आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजचा चेहरा एकाच व्यक्तीचा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये शरीफुल चोरीच्या उद्देशाने घुसला होता. पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला सैफ अलीने पकडले होते. त्याच्या तावडीतून निसटून जाण्यासाठी त्याने सैफ अलीवर चापूने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफ अली हा जखमी झाला होता. हल्ल्यानंतर पळून जाताना आरोपीचे छायाचित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. त्याआधारे पोलिसांनी ठाण्यातून शरीफुलला अटक केली होती. मात्र त्याच्या वडिलांनी त्यांचा मुलगा आरोपी नसल्याचा दावा केला होता. सीसीटीव्ही फुटेजमधील चेहऱयाशी आरोपीचा चेहरा मॅच होत नसल्याचा संशय व्यक्त होत होता. त्यामुळे संबंधित फुटेजसह आरोपीचा फोटो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला होता. या फुटेजसह आरोपीच्या चेहऱयाची तंत्रज्ञानाच्या मदतीने पडताळणी करण्यात आली होती. त्यात दोन्ही व्यक्ती एकच व्यक्ती असल्याचे उघडकीस आले आहे.
लग्न मोडले, नोकरीही गेली; संशयिताची कैफीयत
छत्तीसगडमधील दुर्ग जिह्यातील रहिवासी आकाश कनौजिया (31) याला सैफ अली खान हल्ला प्रकरणात रेल्वे पोलिसांनी चुकून ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या फोटोमुळे हा गैरसमज झाला. नंतर त्याची सुटका झाली असली तरी या घटनेमुळे त्याच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. त्याने आपबिती सांगताना नोकरी गेली, लग्न मोडले तसेच समाजात आदर मिळत नसल्याची व्यथा माध्यमांशी बोलताना मांडली.