मोहम्मद अल-बशीर सीरियाचा काळजीवाहू पंतप्रधान

सीरियात बंडखोरांनी बशर अल असद यांची सत्ता उलथवून टाकून कब्जा मिळवला. लष्कराच्या मदतीने असद यांनी देशातून पलायन केले आणि रशियात आश्रय घेतला. सत्तापालटानंतर पंतप्रधान मोहम्मद गाझी अल-जलाली यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. बंडखोर गट हयात तहरीर अल-शामने देशात अंतरिम सरकारची घोषणा केली असून, त्यांच्या गटाचा प्रमुख मोहम्मद अल-बशीर हा सीरियाचा काळजीवाहू पंतप्रधान असणार आहे. तो 1 मार्च 2025 पर्यंत या पदावर असेल, असे मंगळवारी एका निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले.

अल-बशीरने यापूर्वी बंडखोरांच्या साल्व्हेशन सरकारचे नेतृत्व केले आहे, त्या सरकारने केवळ उत्तर-पश्चिम सीरिया आणि इदलिबच्या काही भागांवर राज्य केले. काळजीवाहू सरकारमधील अन्य सदस्यांचीदेखील घोषणा करण्यात आली आहे. असद यांनी सीरियातून पलायन केल्यानंतर परदेशातून हल्ले वाढत आहेत. इस्रायलने सीरियाच्या दक्षिणेवर तर अमेरिकेनेदेखील हल्ला केला.