मोईन अलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वन डे आणि टी-20 क्रिकेट मालिकेसाठी इंग्लंड संघात स्थान न मिळाल्यामुळे निराश झालेल्या अष्टपैलू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 37 वर्षीय मोईन अली आता इंग्लंडच्या कोणत्याही संघात दिसणार नाही. त्याने गेल्या वर्षी ‘ऍशेस’ मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

मोईनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधीची अपेक्षा होती, मात्र ती न मिळाल्यानंतर तो म्हणाला, आता नव्या पिढीच्या हाती बॅट न देण्याची वेळ आली आहे. निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे आणि मी माझे काम केले आहे. मोईनने 68 कसोटी सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते आणि आता त्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटला अलविदा केले. तो 138 वन डे आणि 92 टी-20 सामने इंग्लंडसाठी खेळला होता. विशेष म्हणजे वन डे आणि टी-20 या दोन्ही फॉरमॅटच्या जगज्जेतेपदाच्या संघात तो होता.

मोईन निवृत्तीच्या निर्णयानंतर म्हणाला, ‘मी अजूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अव्वल क्रिकेट खेळू शकतो. पण तरीही प्रत्येकाने कुठेतरी थांबायला हवे. मी अजूनही इंग्लंड संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो, परंतु मी आता तसे करणार नाही.’