आदिवासींना वनवासी म्हणून हिणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाचा अवमान करतात. अब्जाधीश उद्योगपतींना सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ करणाऱया मोदींनी आदिवासी, मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणली, असा हल्ला काँग्रेस खासदार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
नंदुरबार येथे गुरुवारी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. आरएसएस, भाजपवाले आदिवासींना वनवासी संबोधून त्यांचा जल, जंगल आणि जमीन याच्यावरील अधिकार हिरावून घेत आहेत. आठ टक्के आदिवासींची लोकसंख्या असताना त्यांना तेवढा वाटा मिळत नाही. अवघे नव्वद अधिकारी देशाचा कारभार पाहतात, असेही राहुल गांधी म्हणाले.
मोदींनी उभ्या आयुष्यात संविधान वाचले नाही
मोदी म्हणतात मी सभांमध्ये संविधान दाखवतो ते कोरं आहे. संविधान त्यांच्यासाठी कोरं आहे, कारण त्यांनी आयुष्यात कधीही वाचलं नाही. त्यामुळे त्यांना संविधानाबद्दल माहिती नाही. हे संविधान रिकामं नसून हजारो वर्षांची महापुरुषांची विचारसरणी आहे. महात्मा गांधींच्या विचाराचा हा देश आहे, असे राहुल हातातील लाल रंगाचे संविधान दाखवत म्हणाले.
धारावीची जमीन अदानींच्या घशात
मुंबईतील धारावीची एक लाख कोटींची जमीन मोदींनी अदानींच्या घशात घातली. राज्यात येणारे अनेक उद्योग केंद्र सरकारने गुजरातमध्ये नेऊन पाच लाख रोजगार पळविले. मविआ सरकार आल्यानंतर राज्यातील उद्योग, रोजगार राज्यातच राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.