डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ धोरण, हिंदुस्थानवर काय होणार परिणाम; मोदी सरकारचे संसदेत उत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाचा जगभरात परिणाम दिसून येत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देशातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. तसेच या निर्णयामुळे हिंदुस्थानच्या व्यापारावरही मोठी परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या टेरिफमधून हिंदुस्थानला कोणतीही सूट देण्यात येणार नाही. हिंदुस्थान आमच्यावर प्रंचड कर लादतो. त्यामुळे जशास तसे धोरणाप्रमाणे आम्हीही त्यांच्यावर तसाच कर लादणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. आता या टॅरिफ वादावर केंद्र सरकारने संसदेत माहिती दिली आहे.

आतापर्यंत अमेरिकेने हिंदुस्थानवर कोणताही परस्पर टॅरिफ कर लादलेला नाही. लोकसभेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी असेही सांगितले की हिंदुस्थान आणि अमेरिका एका नवीन व्यापार करारावर चर्चा करत आहेत, त्यात दोन्ही देश आयात शुल्क, जकात कमी करणे आणि पुरवठा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतील. याचा फायदा दोन्ही देशांना होईल असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की हिंदुस्थानने शुल्क कमी करण्यास सहमती दर्शविली आहे. 2 एप्रिल 2025 पासून अमेरिकेपेक्षा जास्त कर आकारणाऱ्या सर्व देशांवर परस्पर शुल्क लादले जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. हिंदुस्थान आमच्यावर खूप जास्त कर लादतो. त्यामुळे आम्ही तसेच कर लादणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. टॅम्प यांच्या या विधाननंतर केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांचे हे विधान केले आहे.

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीदरम्यान दोन्ही देशांनी 2030 पर्यंत परस्पर व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय, 2025 च्या अखेरीस व्यापार करारावरील वाटाघाटी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. व्यापार धोरणाबाबत मंत्री जितिन प्रसाद म्हणाले की, हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणखी सुधारण्यासाठी सतत चर्चा सुरू आहे. भारतीय कंपन्या नवीन बाजारपेठा शोधत आहेत आणि व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. 2023 मध्ये हिंदुस्थान आणि अमेरिकेत एकूण 190.08 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. हिंदुस्थानने अमेरिकेला 83.77 अब्ज डॉलर्सच्या वस्तू निर्यात केल्या आणि 40.12 अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या. अशाप्रकारे, देशाला 43.65 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला, असेही त्यांनी सांगितले.