मोदी सरकार जागे व्हा! हिंदुस्थानींचा अपमान सहन करणार नाही; विरोधकांनी केंद्राला खडसावले

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरीतांविरोधात कठोर कारवाई केली आहे. हिंदुस्थानातील 7.50 लाख नागरिक अवैध पद्धतीने अमेरिकेत राहत असल्याने दिसून आले आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने हिंदुस्थानात परत पाठवण्यात येणार आहे. अमेरिकेतील 104 हिंदुस्थानींची पहिली तुकडी बुधवारी अमृसर येथे पाठवण्यात आली. त्यांनी मालवाहून विमानातून पाठवण्यात आले. त्यांच्या हातात बेड्या आणि पायात साखळदंड होते. त्यांना अशा अपमानास्पद पद्धतीने हिंदुस्थानात पाठवल्याबाबत देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात देशात तीव्र भावना आहे. याचा निषेध करत गुरुवारी संसद परिसरात विरोधकांनी सरकारचा निषेध केला आहे.

विरोधी पक्षांनी हातात फलक घेत सरकारविरधात निदर्शने केली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेते या निदर्शनात सहभागी झाले होते. मोदी सरकार जागे व्हा! हिंदुस्थानींचा अपमान सहन करणार नाही, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच खडसावले आहे. सरकारने अमेरिकेला याबाबत सुनावायला हवे, असेही विरोधकांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनीही याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेतील सुमारे 7.50 लाख हिंदुस्थानींना परत पाठवण्यात येणार आहे. ते त्यांचे सर्वस्व विकून अमेरिकेत गेले होते. आता त्यांच्या पोटावर पाय आला आहे. त्यांना एखाद्या गुन्हेगार, दहशतवाद्यांप्रमाणे परत पाठवण्यात येत आहे. ते दहशतवादी नाहीत. ते हिंदुस्थानचे नागिरक आहेत. त्यांना सन्मानजनक पद्धतीने पाठवनण्यात यावे. या 7.50 लाख लोकांची अमेरिकेतच पोटापाण्याची व्यवस्था करण्यात यावी किंवा त्यांना हिंदुस्थानात रोजगार देण्यात यावा. ट्रम्प हे मोदी यांचे चांगले मित्र आहेत. मोदी ट्रम्प यांच्यासाठी 100 कोटी खर्चून नमस्ते ट्रम्प कार्यक्रम करतात. अमेरिकेत जाऊन अबकी बार ट्रम्प सरकार अशा घोषणा देतात. आता त्यांनी त्यांची मैत्री दाखवावी. आम्ही आमच्या नागिरकांचा आणि हिंदुस्थानचा अपमान सहन करणार नाही. या हिंदुस्थानींना सन्मानाने हिंदुस्थानात आणणे ही पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांची जबाबदारी आहे, असे काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सरकारला सुनावले.

अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या हिंदुस्थानींना स्वीकारण्यास आमचा विरोध नाही. मात्र, त्यांना ज्या प्रकारे परत पाठवण्यात आले आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना हद्दपार करण्याचा त्यांना कायदेशीर अधिकार आहे. त्यांना स्वीकारण्याची आमची तयारी आहे. मात्र, ते हिंदुस्थानी नागरिक आहेत. त्यांना सन्मापूर्वक पाठवावे. एखाद्या दहशतवाद्यांप्रमाणे हातात बेड्या आणि पायात साखळदंड बांधूव पाठवणे हा देशाचा अपमान आहे. असा अपमान आम्ही सहन करणार नाही. कोलंबियासारखा छोटा देश यासाठी अमेरिकेचा निषेध करत असेल तर जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या हिंदुस्थानने अमेरिकाला खडसवायला हवे. त्यांना लष्करी किंवा मालवाहू विमानात साखळदंड बांधून पाठवणे हा हिंदुस्थानचा अपमान आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.