तेल बाजाराच्या आंतरराष्ट्रीय मंदीत केंद्र सरकारची चांदी, उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ

व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात आलेल्या मंदीचा म्हणजेच घसरलेल्या किमतीचा फायदा सामान्य ग्राहकांना देण्याऐवजी उत्पादन शुल्कात वाढ करून केंद्र सरकारने आपली चांदी करून घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर 65 डॉलर प्रति बॅरलवर घसरले आहेत. हिंदुस्थानात मात्र पेट्रोलचे दर 109 रुपयांच्या आसपास तर डिझेलचे 93 रुपयांच्या वर आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीच्या घसरगुंडीचा फायदा देशवासीयांना होण्याची शक्यता नाही. कारण केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात सोमवारी प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करून किमती स्थिरच राहतील याची काळजी घेतली आहे.

मंगळवारपासून हे बदल लागू होतील. यानुसार पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपये करण्यात आले आहे. या करवाढीमुळे हिंदुस्थानात तेलाच्या किमती वाढल्याच्या बातम्या येऊन सामान्यांकडून केंद्र सरकारला लक्ष्य केले गेले. त्यानंतर, उत्पादन शुल्काचा भार तेल आयात कंपन्यांना सोसावा लागणार असल्याने ग्राहकांना याचा फटका बसणार नाही, असा खुलासा करत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने केंद्र सरकारने बाजू सावरली.दरम्यान, भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक झिजिया कर आकारून जनतेची लूट करीत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.