
हिंदूंच्या मुंडक्यांचे मिनार रचणारा, छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणारा, हिंदूंवर जिझिया कर लावणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या संरक्षणासाठी केंद्रातील मोदी सरकार धावले आहे. रत्नपूर येथील औरंगजेबाच्या थडग्याला त्रिस्तरीय संरक्षण देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. औरंगजेबाच्या थडग्याभोवती 12 फूट उंचीचे पत्रे ठोकण्यात आले असून, कुणी उडी मारू नये म्हणून त्यावर काटेरी तार लावण्यात येणार आहे.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब चांगला प्रशासक असल्याचा जावईशोध लावला होता. त्यावरून फडणवीस सरकारने आझमी यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला. त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील संघटनांनी कारसेवा करून औरंगजेबाचे थडगे उखडण्याचा इशारा दिला. त्यासाठी 17 मार्च रोजी या संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनही केले. परंतु, हे आंदोलन सर्वसामान्य जनतेने लाथाडल्यामुळे औरंगजेब हा सध्या संयुक्तिक विषय नसल्याची जाहीर भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घ्यावी लागली.
सगळा मामला केंद्राच्या अखत्यारीत
औरंगजेबाची कबर राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या यादीत असून, त्याची अखत्यारी केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे पर्यायाने केंद्र सरकारकडे आहे. भविष्यातील धोका लक्षात घेऊन पुरातत्त्व खात्याने कबरीला त्रिस्तरीय संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. कबर ज्या परिसरात आहे त्या जैनुद्दीन शिराजी दर्ग्याच्या परिसराला राज्य राखीव पोलीस दलाने वेढा घातला आहे. जैनुद्दीन शिराजी यांच्या मजारकडील पाठीमागील संगमरवरी संरक्षण भिंतीच्या शेजारीच 12 फूट उंचीचे पत्रे ठोकण्यात आले असून, त्यावर लोखंडी अँगल लावून त्याला काटेरी तार लावण्यात येणार आहे. औरंगजेबाच्या कबरीकडे जाणारा मार्ग दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आला आहे.