व्होडाफोनला मोदी सरकारचा रिचार्ज

दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियाला मोदी सरकारने भागीदारीच्या रूपाने रिचार्ज दिला आहे. सरकारने कंपनीत जवळपास 48.99 टक्क्यांपर्यंत भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीतील 36 हजार 950 कोटी रुपयांचे शेअर्स आता सरकार खरेदी करणार आहे. कंपनीकडून अधिकृतरीत्या याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सरकार आता या टेलिकॉम कंपनीत सर्वात मोठा शेअरहोल्डर असणार आहे.

व्होडाफोन आयडियात सरकारची आतापर्यंत 22.6 टक्क्यांची भागीदारी आहे. सप्टेंबर 2021मध्ये दूरसंचार क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या सुधारणा आणि समर्थन पॅकेजच्या अनुषंगाने दूरसंचार मंत्रालयाने स्पेक्ट्रम लिलावाची थकबाकी रक्कम आणि ज्यात स्थगिती कालावधी संपल्यानतंर देय असलेल्या रकमेचा समावेश आहे ही रक्कम सरकारला जारी करण्यासाठी इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्यासाठीची एकूण रक्कम 36 हजार 950 कोटी रुपये आहे.