
73 लाख सबस्क्रायबर्स असणारे 4 पीएम युट्यूब न्यूज चॅनेल राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत केंद्र सरकारने ब्लॉक केले आहे. या यूटय़ूब चॅनेलवर जाताच राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरकारच्या निर्देशानुसार चॅनेलवर कुठल्याही प्रकारचा कंटेन्ट उपलब्ध होणार नाही, असा संदेश दिसत आहे. कोणतीही नोटीस न देता कारवाई करण्यात आली.
न्यूज चॅनेल अशा प्रकारे ब्लॉक करणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप या चॅनेलचे मुख्य संपादक संजय शर्मा यांनी केला आहे. चॅनेल का बंद केले याचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परंतु कदाचित या चॅनेलवरून पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबतच्या बातम्या देणारा व्हिडीयो प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळेच चॅनेलवर कारवाई करण्यात आली असावी, असा दावा संजय शर्मा यांनी केला आहे. सरकारच्या हुकूमशाहीला अजिबात घाबरणार नाही. सर्व राज्यांतील 4 पीएम न्यूज युटय़ुब चॅनेलचा आवाज आणखी बुलंद करणार असे संजय शर्मा यांनी म्हटले आहे.