
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात अनेक द्वीपक्षीय करार केले. मित्राची कडाडून भेट घेतली. परंतु, मोदींची पाठ वळताच आणि मित्राने दिलेली शिदोरी घेऊन ते हिंदुस्थानात परतताच त्याच मित्राने मोठा झटका दिला आहे. हिंदुस्थानातील मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा 1 अब्ज 82 कोटींचा निधी (21 दशलक्ष डॉलर्स) अमेरिकेच्या आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात आहेत त्या एलन मस्क यांनी रोखला आहे.
अमेरिकेच्या दौऱ्यात मोदी यांनी मस्क यांची भेट घेतली होती. यावेळी मस्क यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. मस्क यांनी हिंदुस्थानात टेस्लाचा विस्तार करण्याबाबत आणि उद्योग करारांबाबत मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मोदींनी ट्रम्प यांचीही भेट घेऊन द्वीपक्षीय करारांवर चर्चा केली होती.
बांगलादेश, नेपाळचा निधीही रोखला
मस्क यांनी बांगलादेश आणि नेपाळला दिला जाणारा निधीही रोखला आहे. बांगलादेशात राजकीय स्थिरता राखण्यासाठी आणि लोकशाही अबाधित राखण्यासाठी अमेरिका 29 दशलक्ष डॉलरची मदत देत होती. तर नेपाळला वित्तीय फेडरलिजमच्या नावावर 20 दशलक्ष डॉलर देत होती.तसेच जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी दिलेला 19 दशलक्ष डॉलरचा निधीही रोखला आहे.
वायफळ खर्चावर काट
वायफळ खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने हिंदुस्थानला देण्यात येणारा 1 अब्ज 82 कोटी रुपयांचा निधी रोखल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ट्रम्प नवनवीन योजना आणत आहेत. अमेरिकेच्या नागरिकांच्या करातून येणारा पैसा इतर देशांवर खर्च होत आहे. हा वायफळ खर्च रोखण्याचे काम ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर सोपवले आहे. मस्क यांच्या नेतृत्वाखाली सरकारी दक्षता विभाग काम करत असून या विभागाकडून हिंदुस्थानला मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय स्थिरतेसाठी 1 अब्ज 82 कोटी रुपयांचा निधी देण्यात येत होता. हा निधी आता रोखण्यात आला आहे.