संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवसही अदानी लाचखोरी प्रकरण, संभल आणि मणिपूरमधील हिंसाचारावरून गाजला. ‘मोदी-अदानी एक है!’ ‘संयुक्त संसदीय समिती नेमली गेलीच पाहिजे’, ‘अदानी प्रकरणी संसदेत चर्चा झालीच पाहिजे…’ अशा घोषणांनी संसद भवनाचा परिसर अक्षरशः दणाणून गेला. मकर दरवाजाच्या समोर संसद भवनाच्या पायऱ्यांवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकवटले आणि सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
अधिवेशनापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची बैठक झाली आणि अदानींविरोधातील आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीनंतर सर्व विरोधी पक्ष एकवटले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आमच्या मागण्यांवर पंतप्रधानांनी उत्तर दिलेच पाहिजे अशी मागणी केली. लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपांखाली अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी आणि कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांविरोधात अमेरिकेच्या फेडरल कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संसदेतही या मुद्दय़ावर गांभीर्याने चर्चा व्हावी तसेच या प्रकरणी संयुक्त संसदीय समिती नेमण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. दरम्यान या वेळी संभल आणि मणिपूर हिंसाचार प्रकरणावरूनही विरोधकांनी जोरदार निदर्शने केली. संभलमध्ये झालेला हिंसाचार सरकारनेच रचलेला कट होता. उत्तर प्रदेशात निवडणुका होत्या म्हणून हे घडवले गेले, असा आरोप समाजवादी पार्टीने केला.
संभलसारख्या घटनांआडून देशात आगी लावण्याचा प्रयत्न
संभल हिंसाचार थंड डोक्याने घडवून आणल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे नेते, खासदार अखिलेश यादव यांनी केला. तसेच हिंसाचाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली, तर संभलप्रमाणे बदायूं, जौनपूर आणि अजमेर शरीफ येथेही हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या घटनांच्या माध्यमातून संपूर्ण देशात आगी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सपाचे खासदार राम गोपाल यादव यांनी केला. संभलमध्ये पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.