अष्टविनायक मंदिरातही ड्रेस कोड, पाश्चात्य कपड्यांत देवदर्शन नाही! हाफ पँट, तोकड्या कपड्यांना राहणार बंदी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक मंदिरात जाताना आता भाविकांना कपड्यांबद्दल सजग रहावे लागणार आहे. कारण अष्टविनायक गणपतींच्या दर्शनासाठी भाविकांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मंदिरांचे पावित्र्य अबाधित राखतील असे अंगभर कपडे परिधान करणाऱ्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. पाश्चात्य कपडे परिधान करणाऱ्या भाविकांना मंदिराबाहेरूनच बाप्पांना नमस्कार करावा लागणार आहे.

अष्टविनायक गणपतींमधील मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचे मोरया गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरात दर्शनासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. ही पाचही मंदिरे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारित येतात. त्या ट्रस्टनेच ही पोशाखाची नियमावली जाहीर केली आहे. ही सक्ती नसून विनंती आहे, असे ट्रस्टने म्हटले आहे.

मंदिर प्रवेशासाठी नियमावली

पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख म्हणजेच शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा पोशाख परिधान करावा.

महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावेत.

कोणीही अतिआधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लिव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे घालून मंदिर प्रांगणात प्रवेश करू नये.